23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeबंगाल बंद : बॉम्बस्फोट, गोळीबारात दोघे जखमी

बंगाल बंद : बॉम्बस्फोट, गोळीबारात दोघे जखमी

भाजप नेत्यावर तृणमूलचा हल्ला

कोलकाता : वृत्तसंस्था
आरजी कर मेडिकल हॉस्पिटलमधील ट्रेनी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरून बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. ममता बॅनर्जी सरकारच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी केलेल्या ‘नबन्ना मार्च’वर पोलिसांनी बळाचा वापर केला. त्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने आज बंगाल बंद पुकारण्यात आला. याच दरम्यान स्थानिक भाजप नेत्यावर हल्ला करण्यात आला.
भाजप नेत्यावर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अज्ञात व्यक्ती स्थानिक भाजपा नेते प्रियांगू पांडे यांच्या कारवर गोळीबार करत असल्याचं दिसत आहे. हल्लेखोराने पांडे यांच्या गाडीवर गोळीबार केला. या गोळीबारात कारची काच फुटून गोळी चालकाला लागली. या हल्ल्यात प्रियांगू हे देखील जखमी झाले आहेत. या हल्ल्यात एकूण दोन जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भाजपचे नेते अर्जुन सिंह यांनी या संपूर्ण घटनेचा खुलासा करताना प्रियांगु पांडे आमच्या पक्षाचे नेते असल्याचं सांगितलं. ते गाडीने येत होते. गाडी येताच बॉम्बस्फोट झाला. मात्र वाहन न थांबल्याने गोळ्या झाडण्यात आल्या. चालकाच्या डोक्याला गोळी लागली. गोळी लागल्याने तो खाली पडला. अनेक गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. एसीपींच्या उपस्थितीत हा प्रकार घडला असेही त्यांनी म्हटले आहे.
मोदी विरूद्ध बंद करा, ममतांचा संताप
भाजपच्या पश्चिम बंगाल बंद आणि विद्यार्थी आंदोलनाबद्दल बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, हे भाजपचे कटकारस्थान आहे, ते मी यशस्वी होऊ देणार नाही. पोलिसांनी संयमाने कोलकात्याचे रक्षण केले.  भाजप तपास यंत्रणांची भीती दाखवून लोकांवर दबाव टाकत आहे. माझ्याविरोधात खोटा प्रचार करत आहे, असे  ममता बॅनर्जी म्हणाल्या. जर बंद करायचा असेल, तर मोदींच्या विरोधात करा. उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थानात गुन्हे घडत आहेत, त्यावर भाजप काहीच का बोलत नाही, असा सवाल ममता बॅनर्जींनी केला.
आजचा दिवस मी आरजी कर रुग्णालयातील पीडितेला समर्पित करू इच्छिते. ती आमची छोटी बहीण होती. उत्तर प्रदेश, मणिपूरसह अनेक राज्यात असे घडले आहे, मी हा दिवस त्या पीडितांना समर्पित करते. आरोपींना फाशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR