सोलापूर : संभाजी ब्रिगेडच्या वतीने विजापूर रोड जवळील आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव हा सुमारे ३ कोटी खर्च करून बांधलेला होता गेल्या चार-पाच वर्षांपासून तो तलाव बंद आहे त्यामुळे नागरिकांची व जलतरणपटूंची गैरसोय होत असल्याकारणाने या रिकाम्या तलावात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पोहून गांधीगिरी मार्गाने अनोखे आंदोलन करण्यात आले.
विजापूर रोड जुळे सोलापूर व होटगी रोड परिसरातील नागरिकांना व जलतरणपटूंच्या सोयीसाठी हा जलतरण तलाव बांधण्यात आला होता. २०१८ मध्ये या तलावाचे उद्घाटन करण्यात आले होते.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके दक्षिण सोलापूर तालुका प्रमुख शेखर चौगुले ,दिलीप निंबाळकर, मल्लिकार्जुन चाबुकस्वार विठ्ठल भोसले, आकाश कोळी, सिद्धार्थ राजगुरू, महेश भंडारे, सचिन वनमाने, रमेश चव्हाण राजेंद्र माने ,भरत भोसले ,ओंकार कदम ,सिद्धाराम कोरे ,शेखर कंटेकर रमेश चव्हाण, साईनाथ फडतरे आदि उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष पालकमंत्री व जिल्हाधिकारी उपाध्यक्ष असतात. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत या संदर्भात बैठक झाली होती. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते. परंतु आयुक्त तेली उगले अनुपस्थित असल्यामुळे निर्णय झाला नव्हता. परंतु तो तलाव महापालिकेने दुरुस्त करून द्यावा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले होते. परंतु दोन्ही अधिकाऱ्याची अनास्था दिसून आली. आता नवीन पालकमंत्री यात लक्ष घालतील का असा प्रश्न जलतरणप्रेमीतून होत आहे.
महापालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय ही दोन्ही कार्यालय एकमेकांवर लेखी पत्राने एकमेकावर आरोप करून टोलवाटोलवी करत आहेत. जिल्हा क्रीडा कार्यालयाने १४ फेब्रुवारी २४ पत्राने जलतरण तलाव दुरुस्तीसाठी ५५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च तरी द्यावा किंवा तलाव दुरुस्त करून द्यावा, तेव्हा आम्ही ताबा घेऊ असे कळविले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी सांगितले. तर महापालिकेने ११ डिसेंबर २०२४ च्या पत्राने १५ डिसेंबर पासून ताबा सोडला आहे आणि सुरक्षा रक्षक ही काढून घेतले आहे, असे पत्र दिल्याचे तत्कालीन महापालिका क्रीडा अधिकारी गोपाळ पिडगुलकर यांनी सांगितले होते. त्यामुळे तीन कोटीच्या या शासकीय जलतरण तलावास दोन्ही कार्यालयाने वाऱ्यावर सोडले आहे.