लातूर : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांनी महिला बचतगटांना नेहमी बळ दिले आहे. येणा-या काळात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना आणखी प्रोत्साहन देऊ. बचतगटांच्या क्षमतेनुसार पतपुरवठा करून अधिकाधिक महिलांना सक्षम करू. यासाठी चांगले धोरण आखून नाविन्यपूर्ण योजना राबवू. बचत गटांच्या हितासाठी महिला आर्थिक महामंडळांशी सामंजस्य करार करून महिलांना आवश्यक ती मदत करू, अशी ग्वाही लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी दिली.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लातूर येथील एकता लोकसंचलित साधन केंद्राची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा लातूर येथे झाली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार धिरज देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, कार्यक्रमाच्या उद्घाटक रीड लातूरच्या संस्थापक सौ. दीपशिखा धिरज देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, सचिन दाताळ, सुभाष घोडके, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे, विनोद सरोदे, राहूल लोंढे, अनिल माने, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी मन्सूर पटेल, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सचिन डिग्रसे, सुजाता तोंडारे, साधन केंद्राच्या अध्यक्ष सुकुमार दरकसे, पार्वती वागलगावे, शोभा सवासे, पूजा इगे, संदीप नेवले, अंजली गुंजाळ आदीसह एकता लोकसंचलित साधन केंद्राचे पदाधिकारी, विविध महिला बचत गटांच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.
आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महिला बचत गटांसाठी कर्जमर्यादा वाढवली, व्याजदर कमी ठेवला तरी महिलांचा प्रतिसाद कमी आहे. त्यामुळे येणा-या काळात जिल्हा बँक महिला बचतगटांना इतरांच्या तुलनेत एक टक्का कमी व्याजदराने पतपुरवठा करेल. तसेच व्याज परतावाही कमी असेल. लातूर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी आपल्या अडचणी आम्हाला सांगाव्यात, वैयक्तिक कर्जाचे लेखी प्रस्ताव द्यावेत, त्यांना शासनाच्या निकषांप्रमाणे मदत करू. नाबार्डच्या विविध योजनांचा लाभ देऊ. अधिकाधिक महिलांना लाभ देण्यासाठी सुधारित योजनांची आखणी करू.
सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम मिळेल, अशी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करु. जिल्ह्यात राबविण्यात येणा-या शालेय गणवेश, पोषण आहार, शिधा या योजना जिल्ह्यातीलच महिला बचत गटांमार्फत राबविण्यात याव्यात. तसेच गाव तिथे महिला बचत गट व रोजगार निर्माण करण्यासाठी पुढाकार घेवू, असे धिरज विलासराव देशमुख यांनी यावेळी सांगितले.