22.5 C
Latur
Tuesday, February 4, 2025
Homeसोलापूरबचेरीतील खूनप्रकरणी एकास जन्मठेप

बचेरीतील खूनप्रकरणी एकास जन्मठेप

अकलूज : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा खून करण्यासाठी गेलेल्या आरोपीने त्याच्याऐवजी त्याच्या पत्नीचाच खून केला. याप्रकरणी माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. हुली यांनी आरोपी महादेव विष्णू थिटे (वय ५२, रा. बचेरी ता. माळशिरस) यास जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याबाबत फिर्यादीने माळशिरस पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

महादेव थिटे याच्या मनात अनैतिक संबंधाच्या संशयाचे भूत होते. १ ऑक्टोबर २०१८ च्या रात्री फिर्यादीची आई व अन्य तिघे अंगणात झोपले
होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आरोपी हा फिर्यादीच्या वडिलांचा खून करण्याच्या उद्देशाने ते झोपलेल्या ठिकाणी आला. परंतु त्याच वेळेस फिर्यादीची आई जागी झाल्याने आरोपीने तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला.

काही वेळाने फिर्यादी उठला असता त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. पिलीव येथील दवाखान्यात नेत असता रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर फिर्यादीने माळशिरस पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तपासाअंती संशयावरून महादेव थिटे यास ताब्यात घेतले. आरोपी महादेव थिटे यांनी खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यास अटक केली असता त्याने खून केल्याचे कबूल करून रक्ताने माखलेले त्याचे कपडे व गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड काढून दिली.

त्यानंतर तपास अधिकारी पोलिस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांनी आरोपीच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालय माळशिरस येथे दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी व डॉ अभिनव कचरे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. पोलिसांनी दाखल केलेले पुरावे व सरकारी वकील अ‍ॅड. संग्राम पाटील व अ‍ॅड सूर्यकांत ढवळे यांनी केलेला युक्तिवाद ग्रा धरून न्यायमूर्ती एल. डी. हुली यांनी आरोपी महादेव थिटे यास जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सहाय्यक म्हणून अ‍ॅड एस. टी. मेंढेगिरी व कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक फौजदार विलास पाडुळे व विलास माने यांनी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR