22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रबजरंग सोनवणे शरद पवार गटात

बजरंग सोनवणे शरद पवार गटात

अजित पवारांना धक्का, बीडमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता
पुणे : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. बीड लोकसभा मतदारसंघाकडे आता राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपने दुसरी यादी जाहीर करून बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांच्याऐवजी पंकजांना उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बीडमध्ये भाजपने पंकजा मुंडेंसारखा तगडा उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार, यावर तर्क लढवले जात होते. त्यातच आता अजित पवार गटातून शरद पवार गटामध्ये बजरंग सोनवणे यांनी प्रवेश केला. तेच बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार असतील, असे स्पष्ट होत आहे. बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत. अजित पवारांनी पक्षातून बंड केल्यानंतर त्यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पावारांसोबत जाणे पसंत केले होते. ते धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. तरीही त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बजरंग सोनवणे यांनी बुधवारी सायंकाळी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बीड जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर, महेबूब शेख, उषा दराडे यांच्यासह शरद पवार गटाच्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने तेच महाविकास आघाडीचा उमेदवार असतील, असे मानले जात आहे. असे असले तरी मागच्या काही दिवसांपासून दिवंगत मराठा नेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचे नाव आघाडीवर आहे.

ज्योती मेटेही पक्षात प्रवेश करणार
दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यादेखील शरद पवार गटात प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. तसे झाले तर लोकसभेची उमेदवारी सोनवणेंना मिळणार की मेटेंना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपने पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवले आहे. मात्र, दरवेळीप्रमाणे विरोधी पक्षाकडे तगडा उमेदवार नसल्याचे चित्र सध्या तरी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR