निलंगा : प्रतिनिधी
निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे तत्कालीन उमेदवारानी माझ्या कुटुंबांविषयी व माझ्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध ५० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी दि. ३ डिसेंबर रोजी अशोक बंगला येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की, काँग्रेसने मला तिकीट नाकारले या मागची पार्श्वभूमी सर्वांनाच माहीत आहे. तिकीट वाटपात काँग्रेसने माझ्यावर अन्याय केला. काँग्रेसने मला सोडले मात्र मी काँग्रेसला सोडले नाही, असे सांगत निकटवर्तीय व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष उमेदवारी दाखल केली होती मात्र वरिष्ठांच्या सांगण्यावरून उमेदवारी परत घेतली आणि पक्षाला गालबोट लागू नये म्हणून निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला मात्र निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना तात्कालीन उमेदवार अभय साळुंके यांनी माझ्या कुटुंबाविषयी व माझ्या विषयी आक्षेपार्य वक्तव्य केले.
ही बाब अतिशय गंभीर असून यामुळे निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्याच्या अस्मितेला धक्का लागल्याने विजयी होणा-या जागेवर पराभव पत्करावा लागला असल्याचे ते म्हणाले. तसेच काँग्रेस उमेदवारा सोबत प्रचारात असणा-या काँग्रेसचेच पुढा-याच्या गावामध्ये काँग्रेसला कमी मतदान असल्याचे सांगत खासदार डॉ शिवाजी काळगे यांच्या राणी अंकुलगा गावातही काँग्रेसला कमी मतदान मिळाले असल्याचा त्यांनी खुलासा केला. यामुळे इतरांनी आम्हाला पक्षनिष्ठा सांगू नये आम्ही निष्ठेनेच काम केले आहे आजही निलंगा शहरातून कमी अधिक प्रमाणात काँग्रेसलाच मताधिक्य असल्याचे अशोकराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले. यावेळी सुरेंद्र धुमाळ, व्यंकटराव शिंदे, अनिल अग्रवाल, दीपक चोपणे उपस्थित होते.