25 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्रबरं झालं गेले आता नव्यांना संधी देऊ!

बरं झालं गेले आता नव्यांना संधी देऊ!

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला छत्रपती संभाजीनगरमध्ये लागलेली गळती रोखण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांनी केलेले प्रयत्न फोल ठरले. अखेर पक्षाच्या दहा माजी नगरसवेकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. हात जोडून, दंडवत घालूनही माजी नगरसेवकांनी न ऐकल्याने खैरे चांगलेच संतापले असून बर झाले गेले, त्यांनी पायावर धोंडा पाडून घेतला आहे हे लवकरच त्यांना कळेल असे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी पक्षात स्पर्धा असताना आता जे गद्दार झाले त्यांना तिकीटं दिली. पक्षात विविध पदं दिली, पण शेवटी ते गद्दारच निघाले. लवकरच त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येईल. आम्ही मात्र नव्याने पक्ष बांधणी करू, ज्यांना आतापर्यंत संधी मिळाली नाही, अशा नव्या लोकांना निवडणुकीत संधी देऊ, असे चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेच्या दहा माजी नगरसेवकांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाची चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू होती. माजी महापौरांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात खैरे यांनी शिवसैनिकांसमोर साष्टांग दंडवत घालत कोणीही पक्ष सोडून जाऊ नका, असे आवाहन केले होते. पक्षाला पुन्हा चांगले दिवस येतील, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा, अशी साद त्यांनी घातली होती.
तर दुसरीकडे हे सगळे माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात लवकर प्रवेश व्हावा, यासाठी प्रयत्न करत होते. शिंदे गटातही या माजी नगरसेवकांच्या प्रवेशावरून वादावादी होती हे आता स्पष्ट झाले आहे. आमदार प्रदीप जयस्वाल यांना डावलून या सगळ्यांचा प्रवेश एकनाथ शिंदे यांना संभाजीनगरमध्ये आणून करण्याचा पालकमंत्री संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचा प्रयत्न होता. परंतु ज्या मध्य मतदारसंघातील हे सगळे माजी नगरसेवक आहेत, त्यांच्या प्रवेश मीच करवून घेणार, अशी भूमिका जयस्वाल यांनी घेतली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR