दिल्लीत स्वतंत्र उच्चायुक्तालय स्थापन करा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू असताना बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. बलुच नेता मीर यार बलोच याने रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानची घोषणा करत पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. सोशल मीडियावरही हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दरम्यान, बलुच संघटनेने दिल्लीत स्वतंत्र उच्चायुक्तालय सुरू करण्याची मागणी केली आहे.
मीर यार बलोच हा एक लेखक आणि स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढणा-या बलोच लिबरेशन आर्मीचा नेता आहे. त्याने पाकिस्तानपासून बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याचे घोषित केले. नवी दिल्लीमध्ये बलुचिस्तानचे स्वतंत्र उच्चायुक्त सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्याने भारताकडे केली. तसेच संयुक्त राष्ट्रांनी त्यांची शांती सेना ही बलुचिस्तानमध्ये पाठवावी आणि पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्या सीमेत धाडावे, अशी मागणीही त्याने केली. एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव असताना स्वतंत्र बलुचिस्तानसाठी हालचाली सुरू झाल्या. बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला केला आणि त्यांना क्वेटा सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर बलोच लिबरेशन आर्मीने स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा केली.