इस्लामाबाद : वृत्तसंस्था
भारतासोबतचे तणावपूर्ण संबंध कायम असताना आता पाकिस्तानची अडचण वाढली आहे. पाकिस्तान सरकार आणि लष्कराशी प्रदीर्घ काळापासून लढा देत असलेला बंडखोर गट बलुच लिबरेशन आर्मीने आणखी तीव्र हल्ले करण्याची धमकी दिली. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात गेल्या काही महिन्यांमध्ये ५१ ठिकाणी झालेल्या ७१ हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली. पाकिस्तान सरकार आणि लष्कराच्या संस्था, तळांवरील ७१ हल्ले ऑपरेसन हेरोफच्या अंतर्गत केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
बलुचिस्तानी जनतेवर होत असलेला अन्याय रोखण्यासाठी भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानवर दबाव टाकावा, असे आवाहन बलुच लिबरेशन आर्मीकडून करण्यात आलेले आहे. पाकिस्तानला रोखले नाही तर या परिसरात येणा-या काळात अधिक रक्तपात होईल, असा थेट इशारा बलुच लिबरेशन आर्मीकडून देण्यात आलेला आहे.
गेल्या काही दिवसांत आमच्या बंडखोरांनी केच, पंजगूर, मस्तंग, क्वेटा, जमुरान, तोलंगी, कुलुकी आणि नुशकीसारख्या भागांमध्ये किमान ७१ हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमधून पाकिस्तानी सैन्य, देशाचे गोपनीय तळ, पोलीस स्टेशन, खनिज वाहतूक करणारी वाहने आणि महामार्गांवरील पायाभूत बांधकामांना लक्ष्य करण्यात आले. त्यासाठी आयईडी स्फोट, स्रायपरच्या माध्यमातून होणारा गोळीबार यांचा वापर करण्यात आला. सुरक्षा चौक्यांना लक्ष्य करुन पाकिस्तानी सैनिकांच्या हत्या करण्यात आल्या, अशी माहिती बलुच लिबरेशन आर्मीने दिली.