नागपूर : विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणा-या बसचा भीषण अपघात झाला आहे. नागपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पेंढरी गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती समोर आली. अपघातग्रस्त बसमध्ये नागपूर इथल्या सरस्वती शाळेतील विद्यार्थी होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांची सहल आज वर्धा जिल्ह्यातील बोरधरण येथे जात होती. यावेळी पेंढरी गावाजवळ बसला अपघात झाला. या अपघातात एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे, मात्र त्याला कोणताही दुजोरा अद्याप मिळाला नाही. आज सकाळी एकूण ५ बस विद्यार्थ्यांना घेऊन बोरधरणच्या दिशेने जाताना चार बस पुढे निघाल्या.
तर शेवटी असलेल्या बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसला अपघात झाला. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना नागपूरच्या मिहान येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एका विद्यार्थिनीचा यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. हिंगणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.