चेन्नई : तामिळनाडूतील बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. आर्मस्ट्राँगच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चेन्नई पोलिसांनी शुक्रवारी ४८ वर्षीय भाजप कार्यकर्त्या अंजलाईला अटक केली. ५ जुलै २०२४ रोजी बसपा तामिळनाडूचे अध्यक्ष के. आर्मस्ट्राँगची हत्या झाली होती.
भाजपच्या कार्यकर्त्या अंजलाई या उत्तर चेन्नईतील भाजपच्या जिल्हा पदाधिकारी आहेत. विशेष पथकाने त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्मस्ट्राँगच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीला अंजलाईने १० लाख रुपये दिले होते. दुस-या एका प्रकरणात वेल्लोर मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या चुथाभैया नेत्याने हत्येतील आरोपींना हे पैसे दिले होते.
याप्रकरणी आतापर्यंत एकूण १५ संशयितांना अटक करण्यात आली असून, पोलिस अंजलीची चौकशी करत आहेत, असे तपास अधिका-यांनी सांगितले. पोलिसांनी असेही सांगितले की, के. आर्मस्ट्राँगच्या हत्येपूर्वी अंजलाईने आरोपींना त्यांच्या घरी आश्रय दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण १५ संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक ३३ वर्षीय के. तिरुवेंगडमला पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे.