32.7 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeलातूरबसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याची थाटामाटात मिरवणूक

बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याची थाटामाटात मिरवणूक

निलंगा : प्रतिनिधी
वचन साहित्याच्या माध्यमातून सामाजिक समतेचा व मानवी कल्याणाचा संदेश देणारे बाराव्या शतकातील थोर समाजसुधारक समतानायक महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त निलंगा येथे बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याची थाटामाटात उत्साही वातावरणात, फटाक्याची अतिषबाजी करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.
      मिरवणुकीत डिजे ऐवजी पारंपारिक बँड पथक, भजनी मंडळ, वारकरी,  हलगी पथक, गुगळ पथक, हरियाणा येथील महाकाल पथकाचा देखावा, आदींचा समावेश करण्यात आला होता. या शोभायात्रेतील पारंपारिक व सांस्कृतिक कलाप्रकाराने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. वचन गीत, पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य सादर करत बसव प्रेमी नागरिकांनी मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी उपस्थित हजारो लोकांनी महात्मा बसवेश्वरांचा जयघोष, फटाक्यांची आतिषबाजी व फुलांची उधळण करून महात्मा बसवेश्वरांना अभिवादन केले.
बँक कॉलनी येथे रथावर आकर्षक सजावट करण्यात आलेल्या बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याचे संगणबसव विरक्त मठाचे मठाधिपती संगनबसव महास्वामीजी, माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, शिवाजी रेशमे गुरुजी, शिवसेनेचे विनोद आर्य, सुधीर पाटील, डॉ अरविंद भातांब्रे, बाळासाहेब शिंगाडे, मनोज कोळळे, अविनाश रेशमे, अमोल आर्य, लाला पटेल, प्राचार्य डॉ सिद्धेश्वर पाटील यांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
बँक कॉलनी येथून मोठ्या उत्साही व जल्लोषी वातावरणात, शिवाजी महाराज चौक, संभाजी महाराज चौक मार्गे आनंदमुनी चौक येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. मिरवणूक शांततेत व दिमाखात पार पडली.  यावेळी निलंगा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी बसव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ आग्रे व सचिव राजकुमार चिक्राळे, यांच्या सह बसव जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी बसव प्रेमी नागरिक, अनुभव मंटप च्या महिला यांच्यासह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR