नेपाळमध्ये दुर्घटना, मृतांचा आकडा वाढणार
जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील ४० पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली. या अपघातात २७ जणांना प्राण गमवावे लागले. हे सर्व भाविक जळगाव जिल्ह्यातील भुसावळचे आहेत. यामध्ये अनेकजण जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीपात्रात बस कोसळल्याने बचावकार्य आव्हानात्मक झाले होते. मात्र, वेळीच बचावकार्य सुरू करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील रणगाव, पिंपळगाव, तळवेल, या गावातील सर्व भाविक होते. घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली. गावातील भाविक १६ ऑगस्टपासून अयोध्या, काठमांडू येथे देवदर्शनासाठी गेले होते. १६ ते २८ ऑगस्टपर्यंत असा यांचा प्रवास होता. एकूण दोन लक्झरी बस नेपाळला गेल्या होत्या. गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांनी टाहो फोडला आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गावातून १०४ लोकांचा एक गट १० दिवसांच्या दौ-यासाठी दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये आला होता. हा गट तीन बसमधून प्रवास करत होता आणि त्यांनी पहिले दोन दिवस पोखराला भेट दिली. शुक्रवारच्या दिवशी काठमांडूसाठी रवाना झालेल्या या तीन बसपैकी एक बस मार्स्यांगडी नदीत दुर्घटनाग्रस्त झाली. सशस्त्र पोलिस बल कुरिंतरचे प्रमुख माधव प्रसाद पौडेल यांनी सांगितले की, या तीनही बसमध्ये बहुसंख्य प्रवासी हे कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक होते.