राहाता : प्रतिनिधी
को-हाळे गावच्या शिवारातील भांबारे वस्ती येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सख्ख्या बहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आठवड्यापूर्वीच गोगलगाव या गावात दोन चुलत भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
साहील प्रशांत डोशी (वय १३) व दिव्या प्रशांत डोशी (वय १६, दोन्ही रा. वाणी वस्ती ) अशी मृत बहीण- भावाची नावे आहेत. साहिल हा इयत्ता सातवीत गेला होता तर दिव्या ही इयत्ता अकरावीमध्ये गेली होती.
निळवंडे धरणाच्या आवर्तनातून जिरायत भागातील पाझरतलाव भरण्याचे काम सध्या चालू आहे. हवेत उकाडा जाणवत असल्याने हे दोघे बहीण-भाऊ जवळच असलेल्या तलावात पोहण्यासाठी उतरले. त्यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती समजताच स्थानिक युवकांनी दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.