22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसंपादकीय विशेषबहुराष्ट्रीय कंपन्यांची जीवघेणी चलाखी

बहुराष्ट्रीय कंपन्यांची जीवघेणी चलाखी

अलीकडच्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून केली जाणारी खाद्यपदार्थांमधील हेराफेरी वारंवार उघडकीस येत आहे. सरकारने नुकताच बोर्नव्हिटाची आरोग्यदायी पेय म्हणून जाहिरात करण्यास मनाई करणारा आदेश दिला. नेस्ले या बहुराष्ट्रीय कंपनीच्या अन्यही उत्पादनांमध्ये साखरेचे प्रमाण प्रचंड असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे कंपनीने युरोपमधील बाजारपेठांपेक्षा विकसनशील देशांमध्ये कंपनीने साखरेचा जास्त वापर केला आहे.

सकस आणि चौकस आहार असणे ही काळाची गरज आहे मात्र अलिकडच्या काळात बाजारात मिळणा-या खाद्यपदार्थातील पोषणाचा दर्जा घसरत असल्याने आणि त्यातही फास्ट फुडचा बोलबाला होऊ लागल्याने आपले आरोग्य धोक्यात आले आहे. प्रामुख्याने तरुणाईत जंकफुडची वाढणारी सवय ही चिंताजनक पातळीवर येऊन ठेपली आहे. विशेषत: बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत सातत्याने शंका उपस्थित होत आहेत. या कंपन्या जाहिरातींच्या मा-याने आपली उत्पादने आरोग्यवर्धक असल्याचे सांगत असल्या तरी सत्य बरेचदा वेगळेच असते. अलीकडेच एनर्जी ड्रिंक्स म्हणून ओळखल्या जाणा-या ‘बोर्नव्हिटा’मधील साखरेचे असणारे अति प्रमाण उघड झाले असून ते पेय आरोग्यवर्धक श्रेणीतून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घराघरांमध्ये मूल ५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे झाले की त्याला बोर्नव्हिटा, कॉम्प्लॅन यासारखी पेये देण्यासाठी पालकांची जणू स्पर्धाच लागलेली दिसते, अशा पालकांचे डोळे उघडणारे हे पाऊल आहे.

अन्नपदार्थाविषयी वाढत्या जागरूकतेमुळे अलिकडेच बहुराष्ट्रीय अन्नपदार्थ उत्पादन कंपन्यांचा खरा चेहरा उघड होत आहे. बोर्नव्हिटा हा लहान मुलांसाठी आरोग्यवर्धक असल्याचे सांगितले जात होते; पण प्रत्यक्षात मुलांनी एकदा प्यायल्यानंतर त्याची गोडी लागावी यासाठी त्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात साखर मिसळली जात होती. म्हणजेच लहान मुलांना, तरुणांना चटक लावण्याचे कामच उत्पादक कंपनीकडून केले जात होते. त्याची तपासणी केल्यानंतर सरकारने हे पेय आरोग्यववर्धक असल्याचे सांगू नये, अशी तंबी दिली आहे. या आदेशानंतर धक्का बसलेल्या बहुराष्ट्रीय कंपनी नेस्लेने खुलासा करत लहान मुलांसाठीच्या पदार्थांमधील साखरेचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत कमी केल्याचे सांगितले आहे; पण मग इतक वर्षे ही अतिरिक्त शर्करा ज्या मुला-तरुणांच्या शरीरामध्ये गेली असेल त्याचे काय? हा प्रश्न उरतोच. या उत्पादनाची सवय लागावी यासाठीच भारतासह विकसनशील देशांमध्ये या पदार्थात साखरेचे जादा प्रमाण वापरले जात होते, हे निष्पन्न झाले. ‘पब्लिक आय’ या स्वित्झर्लंडमधील स्वयंसेवी संघटनेने आणि इंटरनॅशनल बेबी फुड अ‍ॅक्शन नेटवर्कच्या निष्कर्षात काही धक्कादायक खुलासे झाले होते. यात बोर्नव्हिटामध्ये प्रमाणाबाहेर साखर असल्याचे आढळले होते. नेस्ले कंपनीने युरोपातील बाजाराच्या तुलनेत भारतात आणि अन्य विकसनशील देशात म्हणजेच आफ्रिका, लॅटिन अमेरिकेत अधिक साखर असलेल्या उत्पादनाची विक्री केली. सरकारच्या आदेशानंतर नेल्से इंडियाने आपल्या उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत साखर कमी केल्याचा दावा केला. विशेष म्हणजे ही कंपनी नेस कॅफे, सेरेलॅक, मॅगी यासारख्या लोकप्रिय खाद्यपदार्थांची निर्मिती करते.

भारतात ६ महिन्यांच्या बाळाला नेस्ले कंपनीचे गव्हापासून बनवलेले सेरेलॅक दिले जाते. सेरेलॅकच्या विविध फ्लेवरच्या १५ उत्पादनांचा अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये एका सेवनात सरासरी २.७ ग्रॅम साखर असल्याचे आढळून आले आहे. अन्य विकसनशील देशांपैकी फिलिपाईन्समध्ये हे प्रमाण ७.३ ग्रॅम आढळून आले आहे; पण हेच सेरेलॅक ब्रिटेन, जर्मनी या देशांमध्ये कोणतीही अतिरिक्त साखर न मिसळता विकले जाते. याचाच अर्थ विकसनशील देशांतील मुलांना त्याची सवय लावण्याच्या दृष्टीने आणि खर्च कमी करण्याच्या दृष्टीने अशी सरमिसळ करण्यात येते, हे उघड आहे. कंपनीचे हे कृत्य मुलांच्या जीवाशी आणि आरोग्याशी खेळ आहे. शरीरात अतिप्रमाणात साखर गेल्यास मधुमेह, हृदयविकारांपासून अन्यही आजार जडण्याचा धोका असतो.

याची ‘नेस्ले’सारख्या जगद्विख्यात बहुराष्ट्रीय कंपनीला कल्पना नसेल, असे मानणे वेडगळपणाचे ठरेल. प्रत्यक्षात या सर्वांची माहिती असल्यामुळेच बहुराष्ट्रीय कंपन्या जाणीवपूर्वक लोकांच्या आरोग्याशी खेळ करीत असतात.
आरोग्याला हानीकारक असलेल्या पदार्थांच्या नियमित सेवनातून अनेक आजार होतात. विशेषत: वजन वाढून स्थूलपणा येतो आणि एकदा स्थूलपणा आला की, पुढील काळात अनेक व्याधी या सहव्याधी म्हणून जडतात. आज बाजारात मिळणारी बहुराष्ट्रीय कंपन्यांची कोणतीही शीतपेये, डबांबद ज्यूस, एनर्जी ड्रिंक्स, बिस्किटे वापरून पाहिल्यास त्यात साखरेचे, सोड्याचे, मीठाचे प्रमाण अधिक असते. या खाद्यपदार्थाचा समावेश अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थात होतो. अलिकडेच ब्रिटिश जर्नलच्या एका खुलाशानुसार अशा खाद्यपदार्थामुळे जीवनमानावरही नकारात्मक परिणाम होतो. आपल्या आहारात अल्ट्रा प्रोसेस्ड फुडचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर शरीरात कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, नैराश्य यासारखे आजार बळावतात. भारतात अलिकडेच अशा आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांची संख्या वेगाने वाढली आहे. आपल्या देशातील ग्राहकराजा जागरूक झाला तर या गोष्टी थांबविल्या जाऊ शकतील. त्याच बरोबर खाद्यपदार्थात किती प्रमाणात साखर आणि मीठ आहे त्याचा उल्लेख पॅकवर ठळक शब्दांत नमूद करणे गरजेचे आहे.

एका अभ्यासानुसार, इंडियन एनर्जी डिंÑक्स अणि स्पोर्टस ड्रिंक्सचा सध्याचा बाजार हा ४.७ अब्ज डॉलरचा आहे मात्र यामध्ये बहुतांश एनर्जी ड्रिंक्स हे अतिशर्करायुक्त आहेत. असे असूनही एनर्जी ड्रिंंक्सची विक्री ही दरवर्षी ५० टक्क्यांनी वाढत आहे. युवकांकडून त्याचे अधिक सेवन केले जात आहे, ही बाब चिंताजनक आहे. कारण यामुळे तरुणांना अकाली वृद्धत्व येण्याचे प्रमाण वाढले असून खुद्द फुड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टँडर्ड्स अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) ने ही बाब गंभीर असल्याचे म्हटले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेता इ-कॉमर्स कंपन्यांनी आपल्या संकेतस्थळावर विकल्या जाणा-या फुड प्रॉडक्टची माहिती योग्य रितीने द्यावी, असे ‘एफएसएसएआय’ने सांगितले आहे. आज बोर्नव्हिटाचे प्रकरण समोर आले असले तरी या निमित्ताने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या बाजारातील सर्वच उत्पादनांवर एकदा क्ष-किरण टाकणे गरजेचे आहे. मागील काळात याच कंपनीच्या मॅगी या उत्पादनामध्ये शिशाचे प्रमाण अधिक आढळले होते.

० सूर्यकांत पाठक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, अ. भा. ग्राहक पंचायत

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR