ढाक्का : वृत्तसंस्था
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार डॉ. मोहम्मद युनूस राजीनामा देण्याचा विचार करत आहेत. राजकीय पक्षांमध्ये एकमत नसल्याने काम करणे कठीण होत आहे असे त्यांना वाटते. युनूस यांनी अशी भीती व्यक्त केली आहे की, राजकीय पक्षांत एकमत होईपर्यंत ते काम करू शकणार नाहीत.
बांगलादेशमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अंतरिम सरकार आणि लष्कर यांच्यातील संघर्ष समोर आला आहे. गुरुवारी लष्करी मुख्यालयात आपल्या अधिका-यांना संबोधित करताना लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमा यांनी स्पष्टपणे सांगितले की, या वर्षी डिसेंबरच्या पुढे सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ नयेत.
लष्करप्रमुखांनी इशारा दिला की युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला संवेदनशील राष्ट्रीय मुद्द्यांवर निर्णय घेण्याचा कोणताही नैतिक किंवा संवैधानिक अधिकार नाही. राखीन कॉरिडॉर आमच्या संमतीशिवाय ते बांधणे बेकायदेशीर आहे. बांगलादेशातील म्यानमार सीमेवरील राखीन जिल्ह्यात मानवतावादी कॉरिडॉर बांधण्याच्या कथित योजनेवरून लष्कर आणि सरकार आमनेसामने आहेत.
डिसेंबरमध्ये निवडणुकांची मागणी
माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)नेही युनूसवर दबाव वाढवला आहे आणि डिसेंबरमध्ये निवडणुका घेण्याची मागणी पुन्हा केली आहे. पक्षाने इशारा दिला आहे की जर सरकारने लवकरच निवडणूक रोडमॅप तयार केला नाही आणि त्याबद्दल सार्वजनिक घोषणा केली नाही तर त्यांना सरकारसोबत सहकार्य करणे कठीण होईल. अंतरिम सरकारचे प्रमुख युनूस यांनी आतापर्यंत जानेवारी-जून २०२६ दरम्यान निवडणुका घेण्याबद्दल म्हटले आहे. डिसेंबर २०२५ नंतर ती पुढे ढकलल्याबद्दल लष्कर संतप्त आहे. यामुळे आणखी संघर्ष वाढू शकतात. युनूस व्यतिरिक्त, कट्टरपंथी जमात-ए-इस्लामी देखील निवडणुका पुढे ढकलण्याच्या बाजूने आहे.