पिंपरी : चिखली, कुदळवाडी परिसरातील बेकायदेशीर भंगार दुकाने, अनधिकृत बांधकामे आणि बांगलादेशी नागरिकांच्या हालचालींवर राज्य सरकार आणि पोलिस प्रशासन आणखी कठोर भूमिकेत आले असून, सर्व यंत्रणांना ‘नो-टॉलरन्स’ मोडमध्ये कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. गृह विभागाने कुदळवाडी परिसरातील बेकायदेशीर भंगार अड्ड्यांवर तातडीने कारवाई करण्याची सक्त सूचना दिली आहे, तर पिंपरी-चिंचवड पोलिसांनीही बांगलादेशी नागरिक आढळून आल्यामुळे पुढील आणखी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने फेब्रुवारी २०२५ मध्ये चिखली-कुदळवाडीत मोठी अतिक्रमणविरोधी मोहीम राबवून हजारो अनधिकृत झोपड्या, पत्राशेड, बांधकामे, भंगार अड्डे आणि अवैध कारखान्यांना जमीनदोस्त केले होते. ही कारवाई इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखणे, परिसराचा नियोजित विकास अमलात आणणे आणि परिसरात वावरणा-या बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांच्या बीमोडासाठी केली होती. या कारवाईनंतरही काही अनधिकृत भंगार दुकानांनी पुन्हा डोके वर काढल्याने शासनाने आता अधिक कठोर पवित्रा घेतला आहे.
वास्तविक, बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या बेकायदेशीर वास्तव्याबाबत आमदार महेश लांडगे यांनी राज्याच्या गृहमंत्रालयाकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर गृहविभागाने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून अहवाल मागवला होता. बेकायदेशीर भंगार दुकाने आणि बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई केली आहे. या पुढील काळातही कारवाई करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी निर्देश दिले आहेत.
गृहविभागाचे आदेश
शासनाने २७ जून २०२५ रोजी विशेष परिपत्रक काढून चिखली, कुदळवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि भंगार व्यवसायांवर समन्वित मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस आयुक्तांनी दिलेल्या अहवालानुसार, परिसरात बांगलादेशी नागरिक आढळल्याने अटक, तपास, सत्यापन व दस्तऐवज छाननीची कारवाई सतत आणि तीव्र पद्धतीने केली जाणार आहे. महापालिका, पोलिस आणि महसूल विभाग संयुक्त मोहीम राबविणार आहेत.

