26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeअंतरराष्ट्रीयबांगलादेश आता पुढचा पाकिस्तान होणार!

बांगलादेश आता पुढचा पाकिस्तान होणार!

शेख हसीनाच्या अमेरिकेतील मुलाचा दावा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
बांगलादेश आता पुढचा पाकिस्तान होणार असल्याचे धक्कादायक वक्तव्य शेख हसीना यांच्या मुलाने केले आहे. तसेच शेख हसीना यांच्याशी आज सकाळी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. सजीब वाजेद जॉय हे कुटुंबासह अमेरिकेत असतात, हसीना देखील आता नातवांसोबत अमेरिकेतच राहतील असेही जॉय यांनी स्पष्ट केले आहे.

हसीना यांनी ब्रिटनकडे राजनैतिक आश्रय मागितल्याचे वृत्त होते. ते जॉय यांनी फेटाळले आहे. एनडीटीव्ही, आजतकला जॉय यांनी मुलाखत दिली. आपल्या आईला बांगलादेश सोडायचा नव्हता, परंतू तिची सुरक्षा पाहता आम्ही तिला समजावले असे जॉय म्हणाले.

देशातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैन्याची ताकद वापरणे गरजेचे झाले होते. परंतू, विद्यार्थ्यांविरोधात सैन्याचे बळ वापरण्यास हसीना यांनी विरोध केला. यामुळे त्यांनी आपणच राजीनामा देणे उचित समजले.

या सर्व घटनाक्रमात जमात-ए-इस्लामीची भूमिका आहे. यामध्ये सामान्य बांगलादेशी मुळीच सहभागी नाहीत, असे जॉय म्हणाले. तसेच आम्ही आमच्या नेत्यांचे संरक्षण नक्कीच करू. १९७५ मध्येही पक्षाच्या नेत्यांची हत्या झाली होती. आम्हाला तशीच परिस्थिती पुन्हा नको होती. परंतू आता बांगलादेशाच्या भविष्याची जबाबदारी आमची राहिलेली नाही, असे स्पष्ट शब्दांत जॉय म्हणाले.

आता बांगलादेश पुढील पाकिस्तान होणार आहे. आम्ही सैन्यावर टीका करणार नाही. हेच त्यांचे नशीब आहे. हसीना पुन्हा कधीही बांगलादेशला परतणार नाहीत. त्या ७७ वर्षांच्या आहेत. त्यांची राजकारणातील ही शेवटची टर्म होती. त्या निवृत्त होणार होत्या. चीनने देशाच्या कारभारात कधीच हस्तक्षेप केलेला नाही. त्यांचा यात हात नाही. बांगलादेशाला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतू आता हसीना लोकांना वाचविण्यासाठी परत येणार नाहीत, असे उद्विग्नपणे जॉय म्हणाले.

आमच्या पक्षाच्या नेत्यांवर हल्ले केले जात आहेत. मला वाटत नाही निष्पक्ष निवडणूक होईल. आमच्या कुटुंबाने बांगलादेशात विकास करून दाखविला आहे. जर आता बांगलादेशचे लोक सोबत उभे राहण्यास इच्छुक नसतील तर लोकांना तेच नेतृत्व मिळेल, ज्याचे ते हकदार आहेत, असे जॉय यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR