बंगळुरु : वृत्तसंस्था
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तीन दिवसीय शिबीर कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथे भरले आहे. या शिबिरात बांग्लादेशातील हिंदू समाजावर होणा-या अन्यायासंदर्भात आरएसएसने ठराव पास केला आहे. हिंदूंवर अन्याय होत असताना आपण याकडे केवळ राजकारण म्हणून दुर्लक्ष करणे किंवा कानाडोळा करणे म्हणजे सत्यापासून तोंड लपवणे आहे. कारण अधिकांश पीडित हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांक समुदायातील आहेत. या प्रकरणात आरएसएसच्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीत युनायडेट नेशनने हस्तक्षेप करावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.
बंगळुरु येथील आरएसएसच्या शिबिरात बांग्लादेशातील हिंदू समाजावर होणा-या अन्यायाबद्दल निषेधाचा ठराव मांडण्यात आला आहे. आपल्याला हिंदू समाजावर होणा-या अन्यायाच्या विरोधात उभे रहायला हवे असे या बैठकीत चिंतन झाले. सामाजिक जीवनात एखादी समस्या असेल तर त्यावर उपाय शोधावा लागतो. केवळ सरकारी पत्रक काढणे, सल्ला देणे ही आरएसएसच्या विचार करण्याची पद्धत नाही. संघाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. आम्ही समाजाच्या ताकदी आधारे समाजातील सर्व प्रश्नांवर उत्तर शोधत असतो. हे या बैठकीत उदाहरणाने समजाविण्यात आले.
बांगलादेशातील हिंसाचार हा केवळ हिंदू विरोधातला नाही तर तो भारताच्या विरोधातला देखील आहे. अविश्वास आणि अविश्वासाचे वातावरण तयार केले जात आहे. बांग्लादेशात हिंदू आणि भारताविरोधात आंतरराष्ट्रीय शक्ती देखील सक्रीय आहेत. पाकिस्तान, डीप स्टेट आदी बांगलादेशात हिंदू समाज आणि भारताविरोधात काम करीत आहेत असे बैठकीत म्हटले गेले.
२१ मार्चपासून बंगळुरू येथे आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक सुरू झाली आहे. ही बैठक एकूण तीन दिवस चालणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी या बैठकीचे उद्घाटन केले. संघाशी संलग्न ३२ संघटनांचे सुमारे १,४८० प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समाजावर होणा-या अत्याचारांची परिस्थिती आणि भविष्यातील उपाययोजनांवरील पहिला ठराव मंजूर करण्यात आला आहे. दुसरा ठराव संघाचा गेल्या १०० वर्षातील प्रवास, शताब्दी वर्षातील उपक्रम आणि भविष्यातील योजना यावर आधारित आहे.