केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अवैध बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना भारतात घुसण्यास मदत करणा-या नेटवर्कवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले आहेत. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून त्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असे मत गृहमंत्र्यांनी व्यक्त केले. अमित शहा यांनी दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता, गृहमंत्री आशिष सूद, दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिका-यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली.
यादरम्यान अमित शहांनी निकृष्ट कामगिरी करणा-या पोलिस स्टेशन आणि उपविभागांवरही कठोर कारवाईचे निर्देश दिले. शहरातील आंतरराज्य टोळ्यांचा निर्दयीपणे नायनाट करणे, हे दिल्ली पोलिसांचे प्राधान्य असले पाहिजे. अंमली पदार्थांच्या बाबतीत कठोर कारवाई करावी आणि हे नेटवर्क मुळापासून संपवावे, असेही शहांनी या बैठकीत सांगितले. बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना देशात घुसण्यास मदत करणा-या संपूर्ण नेटवर्कवर कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांची ओळख पटवून त्यांना हद्दपार करावे, असे शाहांनी स्पष्टपणे सांगितले.