मुंबई : विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या वतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप झाले होते. याकरिता मोठमोठे कार्यक्रम करण्यात आले होते. हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याचे किट वाटप करण्यात आले होते. यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत लाभार्थ्यांची यादीच मिळवली असून कामगार मंत्र्यांकडे सादर केली आहे. त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळातील आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते. आपल्याकडे लाभार्थ्यांची यादीच असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाहीत, अशांना किट वाटप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावर कामगार मंत्री कारवाई करणार की नाही अशी विचारणा त्यांनी केली होती.
विकास ठाकरे यांनी विचारलेल्या या प्रश्नावर कामगार मंत्र्यांनी तपासून कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे. मात्र विकास ठाकरे यांच्याकडे असलेल्या कामगारांच्या यादीत कोणाकोणाची नावे आहेत याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. नागपूरमध्ये झालेल्या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमानंतर किट अनेक प्रतिष्ठित तसेच श्रीमंतांकडे घरपोच पोहोचवून दिल्याची चर्चा रंगली होती. ठाकरे यांच्या दाव्यानंतर यात तथ्य असल्याचे दिसून येत असून आता किट घेणा-या बोगस कामगारांची यादी सार्वजनिक केल्यास अनेकांचे बिंग फुटू शकते.
कामगारांना किट वाटप करण्याचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर धडाधड अर्ज भरून घेण्यात आले होते. अर्ज भरणारा कामगार आहे की नाही याची कुठलीही खातरजमा करण्यात आली नव्हती. ज्याने अर्ज भरले त्याला किट वाटप करण्यात आले. किट घेण्यासाठी नागपूरमध्ये अक्षरश: रांगा लागल्या होत्या.
विधानसभा मतदारसंघनिहाय नागपूर शहरात किट वाटपाचे सहा कार्यक्रम घेण्यात आले होते. एका कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली होती. पोलिसांना लाठीमार करून त्यांना पांगवावे लागले होते. रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात झालेल्या कार्यक्रमात किट घेण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. सभागृहात पाय ठेवायला जागा नसल्याने प्रवेशदार बंद करण्यात आले होते. त्यानंतरही अनेकजण प्रवेशदारावरून उड्या मारून आत जात असल्याने पोलिसांनी लाठीमार केला होता.