लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या दिवशी, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच गंजगोलाई या ठिकाणी, बांधकाम कामगार काम मिळावे या प्रतिक्षेत उघड्यावर थांबतात, लातूर व जिल्ह्यातील इतर लहान शहरात या कामगारांना आवश्यक त्या सुविधांसह हक्काची जागा उपलब्ध करुन द्यावी, मोठ्या शहराप्रमाणे लातूर व इतर लहान शहरे आणि ग्रामीण भागातील कामगारांनाही मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत प्रश्न उपस्थित करून केली, यावर कामगार कल्याण मंत्री आकाश फुंडकर यांनी लातूर शहरातील बांधकाम कामगारांना रोजगारासाठी उभारण्यास हक्काची जागा उपलब्ध करुन दिली जाईल तसेच शहर आणि जिल्हा रुग्णालय, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे बांधकाम कामगारांना उपचार सेवा देण्यात येतील असे सांगीतले.
महाराष्ट्र विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या महाराष्ट्र विधीमंडळ सभागृहात दि. ५ मार्च रोजी प्रश्नोत्तर कालावधीत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सभागृहात लातूर शहरातील बांधकाम कामगारांना रोजगारासाठी थांबण्यास हक्काची जागा नाही. सध्या हे कामगार छत्रपती शिवाजी महाराज चौक, गंजगोलाई यांसारख्या ठिकाणी थांबतात. या कामगारांना मोफत आरोग्य सेवा मिळणे आवश्यक आहे. मोठ्या शहरात आरोग्य सेवा मिळतात, परंतु छोट्या शहरात आणि ग्रामीण भागात तशी व्यवस्था नाही, असा प्रश्न उपस्थित करुन हक्काच्या जागेसोबत लातूर शहरातील बांधकाम कामगारांना मोठ्या मोफत आरोग्य सेवा हव्या आहेत. त्या उपलब्ध करुन दयाव्यात अशी मागणी केली. यावर उत्तर देताना कामगार कल्याण मंत्री आकाश फुडकर यांनी जागेची चाचपणी करून, लातूर शहरातील कामगारांनाही योग्य प्रकारची, आवश्यक त्या सुविधांसह जागा उपलब्ध करून दिली जाईल, लातूर इतरसर्व शहराच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागातील कामगारांना रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्राच्या ठिकाणी योग्य प्रकारचे मोफत उपचार मिळावेत यासाठी संबंधित विभागाबरोबर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे.