लातूर : प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या येथील दिशा प्रतिष्ठानने वर्धापनदिनाच्या औचित्यावर गरजू रुग्णांनासाठी दिशा शस्त्रक्रिया योजनेंतर्गत घेतलेल्या शस्त्रक्रिया योजनेचा ५६ रुग्णांनी लाभ घेतला. लातूर शहरातील अद्यावत रुग्णालयांत मोफत तसेच अल्प दरात त्या करण्यात आल्या. या बांधिलकीचे सर्वत्र स्वागत व कौतूक होत आहे.
माणसे आजारी पडतात अनेकवेळा शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. तथापि त्यांचा खर्च अनेकांना पेलावणारा नसल्याने ते आजार अंगावर काढतात. यातून पुढे गुंतागुत वाढते. प्रसंगी अनेकांबाबतीत हा विलंब जीवावरही बेतू शकतो. नेमके हे ओळखून अशा रुग्णांना मदत करण्याचा संकल्प प्रतिष्ठानने केला व तो वास्तवातही आणला. यासाठी प्रारंभी प्रतिष्ठानच्या पदाधिका-यांनी शहरातील सामाजिक बांधिलकी जपणा-या डॉक्टरांची बैठक बोलवली व आपला मनोदय व्यक्त केला. क्षणाचाही विलंब न करता या डॉक्टरांनी त्यास होकार भरला. रुग्णांना याची माहिती विविध माध्यमातून देण्यात आली. ५० टक्के सवलतीत तर काही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. तसेच रक्त व क्ष-किरण चाचण्यातही अशी सुट देण्यात आली होती.
डोळे, नाक, कान घसा, पोट, हाडांचे आजार असलेल्या रुग्णावर सह्याद्री, पोतदार, सदासुख, काळे, सिग्मा, गोरे प्रज्जवल व दत्तकृपा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाल्या. केवळ आर्थिक अडचणीमुळे कोणीही उपचारापासून वंचित राहू नये, सर्वांना चांगले आरोग्य लाभावे, हिच प्रांजळ भावना या संकल्पामागे होती, असे प्रतिष्ठाच्या पदाधिका-यांनी सांगितले. यापुढे मोतीबिंदू शस्त्रक्रियांवर आम्ही विशेष लक्ष पुरवणार असून त्याचे नियोजन करणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.