लातूर : प्रतिनिधी
प्रत्येक ऋतुत वेगवेगळी फळे बाजारात विक्रीसाठी येतात. सध्या उन्हाळयाचे दिवस असल्याने मनुष्याच्या शरीरातील कमी झालेल्या पाण्याचे प्रमाण भरुन काढणारी फळे बाजारात विक्रीस आली आहेत. यात प्रामुख्याने टरबूज, खरबूज, द्राक्ष यांचा समावेश आहे. अन्य फळांपेक्षा या फळांची किंमत अवाक्यात असल्याने नागरीक मोठ्या प्रमाणात फळे खरेदी करतांना दिसून येत आहे.
शहरातील महात्मा गांधी चौक, गंजगोलाई, फु्रट बाजार, ग्रामीण बस स्थानक, तहसील कार्यलया समोर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, औसा रोड, दयानंद गेट, पाच नं. चौक आदी भागात फळे विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहे. या दुकानांमध्ये सफरचंद, डाळिंब, द्राक्ष, चिक्कु, संत्रे, टरबूज, खरबूज यासह मौसमी फळे विक्रीस आली आहे. ग्रामीण भागातील टरबूज, खरबूज उत्पादक शेतकरी आपली फळे येथे विक्रीस आणत आहे.
जागा मिळेल तिथे रस्त्याच्या कडेला आपली दुकान थाटून या फळाची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहेत. सध्या शहराच्या तापमानात वाढ होत असल्याने नागरीक शरीरातील दाहकता कमी करण्यासाठी फळांचे सेवन करीत आहे. त्यामुळे फळांची मागणी पण वाढली आहे. फळांची मागणी वाढल्याने फळ विक्रेत्यांचे आजच्या घडली तरी अच्छे दिन आले आहे. अनेक जण शहरातील विविध भागात जाऊन या फळांची विक्री करीत आहे. फळांच्या दुकानांबरोबरच भाजीपाला विक्रेत्यांच्या दुकानातही फळे विक्रीस ठेवण्यात आली आहे.