लातूर : प्रतिनिधी
कुठल्याही खाद्यपदार्थाला तिखट तडका देण्यासाठी हमखास वापरण्यात येणा-या लाल मिरचीला यंदा अच्छे दिन आले आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या लातूर मार्केटमध्ये लाल मिरचीला समाधानकारक बाजार भाव मिळत आहे. यामुळे मिरची उत्पादक शेतक-यांनी समाधान व्यक्त करत आहेत.
उन्हाळा सुरू झाला की महिला मसाला तयार करण्याच्या तयारीला लागतात. यंदा जानेवारीपासूनच लाल मिरचीचा ठसका वाढला होता. सुक्या मसाल्यासाठी वापरण्यात येणा-या लाल मिरचीचे दर घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात लाल मिरचीचा चागलाच ठसका ग्राहकांना लागला आहे. शहरातील घाऊक मसाला बाजारात सध्या लाल मसाल्यासाठी वापरण्यात येणा-या मिरच्यांची आवक वाढली आहे. सध्या ४ ते ५ टन मिरचीची बाजारात आवक होत आहे. गेल्या काही दिवसापासून बाजारात लाल मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. लाल मिरची उत्पादक शेतक-यांना चांगला बाजार भावही मिळत आहे. मिरची उत्पादक शेतक-यांच्या कष्टाचे सार्थक होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
गतवर्षाच्या तूलनेत यंदा मिरची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे व्यापारी दिलीप स्वामी यांनी सागीतले. शहरातील बाजारातही सर्वाधिक आवक कर्नाटकातील विजापूर, इंडी, गुलबर्गा येथून होते. सध्या नव्याने हंगाम सुरू झाला असून, आवक अशीच वाढत राहिली, तर दर काही प्रमाणात नियंत्रणात येण्याची शक्यता असल्याचे व्यापारी वर्गानी सागीतले आहे. शहरातील बाजारात विविध प्रकारच्या लाल मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या बाजारात डिलक्स ब्याडगी ३२० ते ४०० रूपये किलो, डिलक्स गुंटूर २०० ते २५० रूपये किलो, डिलक्स तेजा २२० ते २४० रूपये किलो, संकरीत मिरची १६० ते १८० रूपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री होत असल्याचे व्यापारी दिलीप स्वामी यांनी एकमतशी बोलताना सागीतले.