26.1 C
Latur
Tuesday, July 2, 2024
HomeUncategorizedबाजार समितिच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

बाजार समितिच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

सोलापूर : सोलापूर व बार्शी बाजार समितीवर प्रशासक येणार की प्रशासकीय मंडळ ? याबद्दल जिल्ह्याच्या राजकारणात व प्रशासनात कमालीची उत्सुकता लागली आहे. जिल्ह्यातील ११ पैकी सहा विधानसभा मतदारसंघांवर परिणाम करणाऱ्या या दोन्ही बाजार समित्यांचे काय होणार? या समित्या कोणाच्या हातात जाणार? याचा फैसला जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात होणार आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदतवाढ१४ जुलैला तर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदतवाढ
२३ जुलैला पूर्ण होत आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने या दोन्ही बाजार समित्यांच्या प्रारूप मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम व संचालकांची संपणारी मुदतवाढ पाहता या दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुका वेळेत (संचालकांची मुदतवाढ संपण्यापूर्वी) पूर्ण होणे शक्य नाही. दोन्ही बाजार समित्यांवर शासन एका शासकीय अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्तो करणार, की शासकीय अधिकारी व अशासकीय व्यक्तींचा समावेश असलेलेप्रशासकीय मंडळ नेमणार? याबाबत जिल्ह्याच्या राजकारणात उत्सुकता निर्माण झाली आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप आमदार विजयकुमार देशमुख तर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचे वर्चस्व आहे. या दोन्ही बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची वर्षांपूर्वीच मुदत संपली आहे. पणन कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार दोन्ही बाजार समित्यांच्या संचालकांना सहा-सहा महिन्यांच्या दोन मुदतवाढ मिळाल्या आहेत.

पणन कायद्यात तिसऱ्या मुदतवाढीची तरतूद नसल्याने या दोन्ही बाजार समित्यांवरील संचालक मंडळाचे अस्तित्व संपणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात सोलापूर शहर मध्य, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर दक्षिण, मोहोळ व अक्कलकोट या पाच विधानसभा मतदारसंघातील भाग येतो. बार्शी बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे बार्शी विधानसभा मतदारसंघात आहे. जिल्ह्यातील अकरापैकी सहा विधानसभा मतदारसंघांशी निगडित असलेल्या या दोन्ही बाजार समित्यांच्या बाबतीत राज्याचा पणन विभाग काय निर्णय घेतो? यावर आगामी विधानसभा निवडणुकीतील रणनीती ठरण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR