उदगीर : प्रतिनिधी
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी अण्णा हुडे हे आज दि ३ ऑक्टोबर रोजी बाजार समितीच्या सभापती पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यानिमित्ताने उदगीर आडत व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २०२३ मध्ये झाली. या निवडणुकीत शिवाजीराव पुढे यांच्या पॅनलचे १७ संचालक निवडून आले व शिवाजी हुडे हे बाजार समितीचे सभापती म्हणून निवडून आले. निवडून आल्यानंतर विरोधकांनी शिवाजी हुडे यांच्यासह पाच संचालकांच्या विरुद्ध निवडणूक नियम १० (२) नुसार अपात्रतेची कारवाई करावी. असा अर्ज जिल्हा उपनिबंधकाकडे दिला. त्या अर्जानुसार शिवाजी हुडे हे शेतकरी नसून व्यापारी आहेत, त्यांची मुले व्यापार करतात. ते दाल मिलमध्ये प्रोप्रायटर आहेत, तसेच सचिन अग्रो प्रोटीनचे भागीदार आहेत. त्यांचे मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत शेतीपासून नाही म्हणून ते व्यापारी आहेत. असा आरोप करून त्यांना संचालक पदावरून अपात्र करावे. असा अर्ज जिल्हा उपनिबंधकाकडे देण्यात आला. त्यावर रीतसर सुनवाई होऊन उपनिबंधक सहकारी संस्था यांनी पाचही संचालकांना अपात्र केले.
या पाचपैकी चार संचालकांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर येथे कलम १०५ प्रमाणे अपील दाखल केले. त्यावर रीतसर सुनवाई होऊन चार मधून दोन संचालकांना अपात्रतेचे आदेश कायम ठेवले व पद्माकर उगले आणि ज्ञानेश्वर पाटील यांचे अपील मंजूर केले. मात्र संचालक शिवाजी हुडे व देवकते यांनी विभागीय सहनिबंधकाच्या आदेशाच्या नाराजीने उच्च न्यायालयात अॅड. उद्धव मोमले यांच्या मार्फत याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी १० सप्टेंबर रोजी पूर्ण होऊ निर्णयासाठी याचिका राखीव ठेवली होती. दि २६ सप्टेंबर रोजी याचिका अंशत: मंजूर केली व जिल्हा उपनिबंधक व विभागीय सहनिबंधक यांनी दिलेले अपात्रतेचे आदेश न्यायालयाने रद्द केले. फक्त सचिन अॅग्रो प्रोटीन या कंपनीचा शिवाजी हुडे यांचा काही संबंध आहे का? हे फक्त पाहून जिल्हा उपनिबंधक आणि निर्णय घ्यावा. या कारणास्तव हे प्रकरण उपनिबंधक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे वर्ग करून त्यामध्ये निर्णय घेण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे शिवाजी हुडे यांचा पुन्हा सभापती पदावर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकरणांत शिवाजीराव हुडे यांच्यामार्फत अॅड. महेश देशमुख, अॅड. उद्धव मोमले, अॅड. अजय डोणगावकर, दत्तात्रय पांचाळ व बाजार समितीमार्फत अॅड. शैलेंद्र गंगाखेडकर यांनी पद्माकर उगिले व ज्ञानेश्वर पाटील यांच्यामार्फत अॅड. मनीष त्रिपाठी यांनी काम पाहिले. सरकार पक्षाकडून अॅड. किरण जाधव यांनी काम पाहिले. शिवाजी अण्णा हुडे यांच्या पदग्रहण समारोहाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षात नवचैतन्य पाहायला मिळत आहे. या निकालामुळे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडीला बळ मिळणार आहे.