सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अपेक्षित आवक नसताना देखील कांद्याचा सरासरी भाव साडेतीन हजारांवरून दोन हजारांपर्यंत खाली आला आहे. बाजार समितीत ४६ हजार ७२० क्विंटल कांदा सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला.
कांदा लागवडीपूर्व मशागतीपासून बियाणे तथा रोपे, लागवड, खते-औषधे फवारणी, खुरपणी, काढणी व भरून बाजार समितीत पाठविण्यापर्यंत एकरी तब्बल ९० हजार ते एक लाखापर्यंत खर्च होतो. पण, भाव सरासरी तीन हजाराच्या खाली असल्यास खर्च देखील निघत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यातच पावसाळ्याच्या सुरवातीला लावलेला हजारो हेक्टरवरील कांदा जागेवरच खराब झाला.
पुन्हा कांदा लागवड केली तर भावात घसरण, अशा संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय देखील केंद्र सरकार घेत नसल्याने दरात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागणी करूनही केंद्राने त्यांच्या पत्राची दखल घेतलेली नाही.
गतवर्षी देखील त्यांनी निर्यातबंदी उठविण्याची मागणी केली होती, त्यावेळी देखील त्यांची मागणी केंद्राने मनावर घेतली नव्हती. आता भावात सुधारणा होण्यासाठी केंद्र सरकार शेतकरीहिताचा निर्णय घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील दराच्या तुलनेत बंगळूरच्या बाजारपेठेत कांद्याला ५०० ते ९०० रुपयांपर्यंत जादा दर मिळतो. वाहतूक खर्च जास्त असला तरीदेखील कांद्याला भाव अधिक मिळतो म्हणून सोलापूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी बंगळूरला कांदा पाठवत आहेत.