30.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रबाजीराव विहीर येथे पार पडले उभे-गोल रिंगण

बाजीराव विहीर येथे पार पडले उभे-गोल रिंगण

लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

वाखरी मुक्कामी पालखी सोहळा विसावला

पंढरपूर /प्रतिनिधी
आषाढी यात्रेकरीता पंढरपूच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल व तुकाराम महाराज पालखी सोहळ््यातील उभे रिंगण शुक्रवारी बाजीराव विहिरीच्या जवळ रंगले. आनंदाने वारकरी विठूनामाच्या जयघोषात नृत्यामध्ये तल्लीन झाले होते. बाजीराव विहीर परिसरात रिंगणाचा सोहळा वारक-यांनी अनुभवला. रिंगण सोहळ््याचा आनंद महामार्गाच्या उड्डाणपुलावरून भाविकांना घेता आला. या भव्यदिव्य रिंगण सोहळ््यामुळे शेकडो किलोमीटर अंतर पायी आलेल्या वारक-यांचा शीण गेला. त्यानंतर वाखरी मुक्कामी पालखी सोहळा विसावला.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावळ््या विठूरायाच्या दर्शनासाठी राज्यासह देशाच्या विविध भागातून निघालेल्या संतांच्या पालख्या शुक्रवारी वाखरीत दाखल झाल्या. तत्पूर्वी, दुपारी १ वाजता भंडीशेगाव येथून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवला. त्यापूर्वी संत सोपानकाका यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे निघाला. त्यानंतर पिराची कुरोली येथून जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा निघाला. पालखी सोहळ््यातील वारक-यांनी संतांच्या पालख्यांचे दर्शन घेत आपापल्या सोहळ््यात सहभाग घेतला.

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उभ्या रिंगणसाठी बाजीराव विहीर समोर आला. दुपारी ४ वाजता उभे रिंगण पूर्ण झाले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा रिंगण स्थळी आला. यानंतर सेवेक-­यांनी टाळमृदंगाचा तालावर खांद्यावरून पालखी नाचवत तेथे थांबलेल्या वारक-­यांच्या भोवती गोल रिंगण घातले. त्यानंतर मानाच्या दिंड्यांनी झेंडा घेऊन रिंगणात प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर अश्वस्वार रिंगणाला सुरवात झाली. त्यावेळी अश्वांच्या टापाची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली.

पालखी सोहळा वाखरी मुक्कामी विसावला
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळयातील सोलापूर जिल्ह्यातील दुसरे उभे रिंगण तर चौथे गोल रिंगण बाजीराव विहीर येथे पार पडले. यानंतर सायंकाळी पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवर असलेल्या वाखरी पालखी तळ येथे विसावला. शनिवारी वाखरी येथून दुपारी पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पंढरपूरच्या वेशीवर पालखी सोहळे आल्याने भाविक पांडुरंगाचा जयघोष करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR