लातूर : प्रतिनिधी
कष्टकरी, हमाल मापाडी, असंघटित कामगार, घरेलू कामगार आणि दलितांसाठी काम करणारे कृतिशील समाजवादी विचारवंत बाबा आढाव यांनी काम केले. त्यांना राजकारणात अनेक संधी असताना त्यांनी आयुष्यभर रस्त्यावर उतरून समाजकारण केले. उपेक्षित माणूस हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता.त्यांनी मूल्यहीन तडजोड कधीच केली नाही, त्यामुळे आजच्या काळात लोकशाही, संविधानाशी एकनिष्ठ राहून कार्य करणे हीच बाबा आढाव यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांनी लातूर येथे व्यक्त केले.
राष्ट्र सेवा दल, कामगार संघटना, हमाल पंचायत, मराठवाडा जनता विकास परिषद, बाबासाहेब परांजपे फाउंडेशन, भटक्या विमुक्त आदिवासी संघटना, छात्रभारती व विविध समविचारी संघटनाच्या वतीने लातूर येथील बाबासाहेब पराजपे फाउंडेशन वाचनालय येथे बाबा आढाव यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बाबांना श्रद्धांजली वाहताना प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे बोलत होते. तसेच प्राचार्य डॉ. अनिरुद्ध जाधव म्हणाले, स्व. माजी खासदार बापू काळदाते यांच्यामुळे बाबा आढाव यांचा संपर्क आला. ते अनेकवेळा माझ्या घरी मुक्कामी असायचे. बाबांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. आणि बाबा म्हणायचे जास्त गरजवान लोकांसाठी काम करण्याची गरज आहे. तर पुरोहितशाही, भांडवलशाही विरोधात पुरोगामी चळवळी सक्षम करण्याचे कार्य बाबांनी केले.
‘आरएसएस ढोंगबाजी’ नावाचे त्यांनी पुस्तक लिहून समतेचा आणि महिला सन्मानाचा त्यांनी विचार पेरला. त्या विचाराप्रमाणे आपण आचरण केले पाहिजे. या शब्दात डॉ. नागोराव कुंभार यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच छात्रभारतीचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. अर्जुन जाधव यांनी बाबा आढाव धाराशिवला आले असताना कचरा वेचणा-या महिलांकडे मला कसे घेऊन, तो किस्सा सांगितला. बाबामुळे माझे वाचन वाढल्याचे सांगितले. अतुल देऊळगावकर म्हणाले, बाबा डॉक्टर होते, त्यांनी कष्टक-यांचे दु:ख पाहिले आणि त्यांच्यासाठी काम करायला लागले. महाराष्ट्रात पहिल्यांदा झूनका भाकर केंद्र बाबांनी सुरु केले. सत्यशोधन समितीचे कामही त्यांनी केले.
याशिवाय अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार होळीकर, बाबासाहेब पराजपे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बी. आर. पाटील, सूर्यप्रकाश धूत, रामराजे आत्राम, विजय चव्हाण, माझं घरचे शरद झरे, ‘लसाकम’चे नरशिंग घोडके, ‘अंनिस’चे उतरेश्वर बिराजदार, हेमलता वैद्य, सुनीता अरळीकर, निशिकांत देशपांडे आदींनी बाबा आढाव यांच्याबद्दलच्या आठवणी सांगून श्रद्धांजली अर्पण केले. राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग देडे, रामकुमार रायवाडीकर, भाऊसाहेब उमाटे, डॉ. गणेश गोमारे, शिवाजी कांबळे यांनी या श्रद्धांजली सभेचे संयोजन केले. कार्यक्रमाला डॉ. कुसुम मोरे, सुमती जगताप, हेमलता वैद्य, रजनी वैद्य, अॅड. उदय गवारे, प्रकाश घादगीने, संदीपान बडगिरे, निशिकांत देशपांडे, वसंतराव उगले, सुपर्ण जगताप, डी. एस. नरसिंगे, रामानुज रादंड, अनिल दरेकर, शेख शफी, आजम पठाण, श्रीकांत मुद्दे, शामसुंदर बांगड, डॉ. दशरथ भिसे, सुधीर भोसले, डॉ. रब्बानी शेख, श्याम वरयांनी आदींसह विविध संघटनाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

