32.6 C
Latur
Wednesday, April 2, 2025
Homeपरभणीबाभूळगाव-उजळंबा एमआयडीसी भूसंपादन कामास गती द्या

बाभूळगाव-उजळंबा एमआयडीसी भूसंपादन कामास गती द्या

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

परभणी : परभणी तालुक्यातील मौजे बाभूळगाव उजळंबा येथे एमआयडीसी स्थापन करण्यासाठी आ. राजेश विटेकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची नुकतीच भेट घेतली. भूसंपादनाअभावी औद्योगिक वसाहत स्थापन होत नसल्याने अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उद्योगमंत्री सामंत यांनी एमआयडीसीचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना भूसंपादनबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

पाथरी विधानसभा मतदारसंघातील बाभूळगाव – उजळंबा येथे नवीन औद्योगिक वसाहत प्रस्तावित आहे. या गावाजवळून समृद्धी महामार्ग जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने नवीन औद्योगिक धोरण २०२५ जाहीर केले असून येत्या पाच वर्षात महामार्गालगतच्या ठिकाणी नवीन उद्योग, हब विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील नव उद्योजकांना औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंडाची गरज भासणार आहे.

परभणी तालुक्यातील पाथरी मतदार विधानसभा मतदारसंघातील बाभूळगाव – उजळंबा येथे अतिरिक्त परभणी टप्पा एक अंतर्गत ७०२ हेक्टर जमीन अधिसूचित करण्यात आलेली आहे. त्यास उच्चअधिकार समितीची मंजुरी प्राप्त झालेली असून सन २०११ दरम्यान प्रकरण सहाची अधिसूचना प्रसिद्ध झालेली आहे. तसेच ३२ (२) व संयुक्त मोजणीची कारवाई पूर्ण झाली आहे.

परंतु अनेक वर्षापासून दर निश्चिती कारवाई प्रक्रिया रखडलेली आहे. यापूर्वीच गतीने दर निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करून तसेच शेतक-यांना योग्य तो मोबदला देऊन जमिनी ताब्यात घेण्याची गरज होती. परंतु प्रशासकीय स्तरावर या प्रकरणी दिरंगाई होत असल्याचे आ. विटेकर यांनी सांगितले.

प्रधान सचिव, उद्योग यांच्या स्तरावर बैठक बोलावून दर निश्चिती, मावेजा वाटप करून शेतक-यांच्या जमिनी ताब्यात घेऊन प्रत्यक्षात औद्योगिक वसाहत स्थापन करण्याबाबत आदेश करावेत. तसेच या संदर्भात बैठक आयोजित करण्यात यावी अशी विनंती आ. विटेकर यांनी मंत्री सामंत यांना केली. या पार्श्वभुमीवर पुढील महिन्यात ही बैठक होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR