22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरबालनाट्य कलेतून व्यक्तिमत्त्व घडते

बालनाट्य कलेतून व्यक्तिमत्त्व घडते

लातूर : प्रतिनिधी
नाट्यकलेतून व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे कांगोरे उलगडण्यास मोठी मदत होते मात्र बालनाट्य ही कला व्यक्तिमत्व घडविण्यासाठी अतिशय उत्तम माध्यम असल्याचे सांगत बालनाट्य कला अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी अखिल भारतीय बालनाट्य परिषद कार्यरत आहे. बालनाट्य कलेचे विविध प्रकार असून यात सर्व प्रकारांचे प्रशिक्षण व त्याची ओळख लातूरमध्ये बाल कलाकारांना करून देत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण अग्रेसर राहू, असा विश्वास अखिल भारतीय बालनाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश पारखी यांनी दिला आहे.

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे १०० वे विभागीय नाट्य संमेलन लातुरात होत असून त्याच्या पूर्वरंगानिमित्त ‘बोक्या सातबंडे’ या बालनाट्य प्रयोगाचा शुभारंभ करताना प्रकाश पारखी बोलत होते. येथील स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहाच्या कै. रवींद्र गोवंडे रंगमंचावर आयोजित या कार्यक्रमास अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सतीश लोटके, नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्य आनंद कुलकर्णी, डॉ. बालाजी वाघमारे, शिवान शिंदे, अखिल भारतीय नाट्य परिषद लातूर महानगरचे अध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, लातूर शहर शाखेचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, संजय अयाचित, निलेश सराफ, दीपक वेदपाठक, सुबोध बेळंबे यांच्यासह अखिल भारतीय बालनाट्य परिषद लातूर शाखेच्या अध्यक्षा अपर्णा गोवंडे आदींची रंगमंचावर उपस्थिती होती. प्रयोगाच्या शुभारंभापूर्वी नटराज व कै. रवींद्र गोवंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले.

मानवी जीवनात नाटकाला मोठे महत्त्व आहे मात्र ही नाट्यकला चळवळ अधिक व्यापक व वृद्धिंगत व्हावी यासाठी बालनाट्य कलेची जोपासना अतिशय गरजेचे असल्याचे सांगून प्रकाश पारखी यांनी महानगरांसोबत ग्रामीण भागात ही बालनाट्य कला जिवंत ठेवण्यासाठी बालनाट्य परिषदेच्या वतीने सातत्याने वेगवेगळे उपक्रम व शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. बालनाट्य कला ही चार प्रकारांमध्ये मोडत असल्याचे सांगत त्यामध्ये कथाकथन, नाट्यछटा, एकांकिका, नाट्यगायन यांचा समावेश होतो. प्रत्येक बालकामध्ये एक कलाकार दडलेला असून या कलाकारावर बाल वयातच कलेचे संस्कार झाल्यास मोठे कलाकार निर्माण होतात. यासाठीच लातूरमध्येही बाल कलाकारांवर योग्य संस्कार करून त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अखिल भारतीय बालनाट्य परिषद पुढाकार घेणार असल्याचे प्रकाश पारखी यांनी सांगितले. लातूरला नाट्य कलेची मोठी परंपरा असून आगामी काळात यामध्येही लातूर पॅटर्न घडविण्यासाठी नाट्य परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या वेळी सतीश लोटके, अ‍ॅङ. शैलेश गोजमगुंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. बालनाट्य परिषद लातूर शाखेच्या नवनिर्वाचीत अध्यक्षा अपर्णा गोवंडे यांनी प्रास्ताविकात लातूर बालनाट्य परिषदेच्या वतीने आगामी काळात विविध उपक्रम राबवत बाल कलाकार घडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाल कुलकर्णी व श्वेता आयाचित यांनी केले. १०० व्या नाट्य संमेलनाच्या पूर्वरंगानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘बोक्या सातबंडे’ या बालनाट्याचा शुभारंभ या नाटकातील मुख्य बाल कलाकार आरुष बेडेकर याच्या हस्ते घंटा वाजवून करण्यात आला. या बालनाट्यास लातूर शहरासह परिसरातील बालकांनी व रसिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR