छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्या प्रकरणी तीन महिन्यांनी तब्बल १५८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये नवरदेव, त्याचे कुटुंबीय यांच्यासह भटजी, मंडप व्यावसायिक आणि व-हाडी मंडळींचा समावेश आहे. गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथे १३ नोव्हेंबर रोजी हा विवाह पार पडला होता. मात्र तीन महिन्यांनंतर बालविवाह अधिकारी यांच्या तक्रारीनंतर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पैठण तालुक्यातील सनी भालेराव या युवकाचा विवाह भेंडाळा इथल्या १५ वर्षीय मुलीसोबत निश्चित करण्यात आला. मात्र विवाह करताना नवरीच्या वयाचा सासरच्या किंवा तिच्या कुटुंबीयांनी विचार केला नाही. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी हा विवाह नक्की झाला. विवाहाबाबत पोलिस यंत्रणेला माहिती मिळाली.
मात्र तालुक्यात विवाह नेमका कुठे होणार आहे, याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली नाही. विवाह सोहळा पार पडला, त्यानंतर तीन महिन्यांनी सबळ पुरावे मिळाल्याने बालविवाह अधिकारी राहुल चराटे यांनी गंगापूर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.