लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक समाज सेवेत आपली महत्वपूर्ण योगदान असते. समाजातील कुप्रथा मोडीत काढण्यातही या स्वयंसेकवकांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरते. तसेच बालविवाह रोखण्यातही या स्वयंसेवकांची महत्वपूर्ण भुमिका असते, असे मत अॅड. श्रीनाथ पाटील यांनी व्यक्त केले.
येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयच्या वतीने लातूर तालुक्यातील मौजे टाकळी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात ‘बालविवाह प्रतिबंध कायदा’ या विषयावर बौद्धिक सत्रात अॅड. श्रीनाथ पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, ब्रिटिशकालीन कायदे प्रभावहीन ठरल्याने २००६ चा बालविवाह प्रतिबंध कायदा सरकारला आणावा लागला. मागील काही वर्षात महाराष्ट्रात विशेषत: बीड, जालना, लातूर या व इतर जिल्ह्यात बाल विवाहाचे प्रमाण मोठया प्रमाणात असल्याने बालविवाह होणा-या मुलींचे शारीरिक शोषण होते.
परावलंबीत्वाचे प्रमाण वाढले. याशिवाय समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन होते. अॅड. श्रीनाथ पाटील यांनी २००६ च्या बालविवाह कायद्या नुसार उद्देश, शिक्षा, परिणाम इत्यादी बाबींचा सविस्तरपणे उहापोह केला व विद्यार्थ्यांना आवाहन केले की त्यांच्या गावात परिसरात होणा-या बालविवाह निडरपणे पुढाकार घेऊन रोखायला हवेत.या क्षेत्रात अॅड. समीर शेख यांनीही सायबर गुन्हे घडण्याची कारणे, सायबर फसवणूक करण्याची पद्धत व त्यातून होणारे आर्थिक, मानसिक परिणाम याचाही सविस्तरपणे आढावा घेतला व शिबिरार्थींना सायबर फ्रॉडबाबत समाजात जागृती निर्माण करण्याचे आव्हान केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कार्यक्रमाधिकारी प्रा. गुरुनाथ देशमुख यांनी भूषविले. सूत्रसंचालन श्रावणी काळे हिने केले व आभार प्रदर्शन राजनंदिनी ठाकूर हिने केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. माधव पलमंटे यांनी मानले.