लातूर : प्रतिनिधी
शहरातील आयकॉन या खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणारे स्व. बाळू डोंगरे या कर्मचा-याचा खून झाला. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नुकतेच त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचीसांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला होता, त्यांच्या घरानजीक असलेल्या केशवराज विद्यालयाने त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारावे, अशी विनंती संबंधित मुख्याध्यापकांकडे करण्यात आली होती. त्यानुसार केशवराज विद्यालयाने बाळू डोंगरे यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.
बाळू डोंगरे यांची मुले रुद्राली बाळू डोंगरे इयत्ता तिसरी व उत्कर्ष बाळू डोंगरे इयत्ता पहिली यांच्या शिक्षणाची जबाबदारी केशवराज शाळेने स्वीकारल्याचे पत्र भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाहक यांनी दिले आहे, रुद्राली व उत्कर्ष बाळू डोंगरे यांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी केशवराज विद्यालयाने घेतल्याची माहिती पत्राद्वारे देण्यात आली आहे.
दि. ४ जानेवारी रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी बाळू डोंगरे यांची आई प्रेमा डोंगरे, वडील भारत डोंगरे, पत्नी छाया डोंगरे यांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते सदर पत्र देण्यात आले. यावेळी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह शैलेश कुलकर्णी, केशवराज शाळेचे मुख्याध्यापक विष्णू सोनवणे, महादेव ढमाले, व्यंकटेश पुरी आदी उपस्थित होते.