मुंबई : प्रतिनिधी
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या शपथविधीचा मुहूर्त सांगितला आहे. याप्रकरणी ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे कधीपासून राज्यपाल झाले? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान, महायुती सरकारमधून मुख्यमंत्रिपदाची संधी कोणाला मिळणार? नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? असे प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. मात्र काही वेळापूर्वीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या शपथविधीचा मुहूर्त सांगितला आहे. याप्रकरणी आता विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे. ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे कधीपासून राज्यपाल झाले? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांना नव्या सरकारच्या शपथविधीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी मुख्यमंत्री होणार कोण? हे कुठे अजून ठरलेले आहे, अशी टीका केली. ते पुढे म्हणाले की, दुसरी गंमत अशी आहे की, एका पक्षाच्या तसेच राज्याच्या अध्यक्षांनी शपथविधीची तारीख आणि मुहूर्त ट्वीट करून सांगितले आहे.
खरे तर शपथविधीबाबत माहिती देण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. चंद्रशेखर बावनकुळे कधीपासून राज्यपाल झाले? मुळात त्यांनी जे स्वत: ट्वीट केले आहे, मला प्रश्न विचारायचा आहे की, आपला देश कधीपासून ट्विटरवर चालायला लागला आहे. शपथविधीची तारीख आणि मुहूर्त याबद्दलची माहिती राज्यपालांच्या ऑफिसमधून यायला पाहिजे होती. पण त्याचे हे सर्व नाटक नेहमीच चालू राहणार आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या कारभारावर संताप व्यक्त केला.