आंबेगाव (पुणे) : वृत्तसंस्था
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर केल्याप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयात बिबट्याच्या नसबंदीविषयी जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना बेंडे म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्र आंबेगाव, शिरूर व परिसरात सध्या ऊस क्षेत्र भरपूर प्रमाणात वाढलेले असल्याने बिबट्यांना वास्तव्यास उपयुक्त जागा झालेली आहे. बिबट्या वन्य प्राणी असून पाळीव प्राणी व जनावरे त्याचे मुख्य भक्ष्य आहे.
सद्या बिबट्यांची संख्या वाढल्याने हल्ले करण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली असून भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीवर येवू लागले आहेत. पाळीव प्राण्याबरोबरच ते लहान मुले, महिला व पुरुषांवर हल्ले करू लागल्याने हल्ल्यांमध्ये जखमी तसेच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मनुष्य व पाळीव प्राणी यांच्यावर होणारे हल्ले रोखण्यासाठी किंवा आळा घालण्यासाठी तसेच बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनामार्फत बिबट्याची नसबंदी करणे गरजेचे आहे.
बिबट्याची नसबंदी करण्याकरीता उच्च न्यायालय, मुंबई येथे अॅड. तेजस देशमुख यांचे मार्फत भिमाशंकर कारखान्याच्या वतीने जनहित याचिका दाखल केली आहे.