इस्लामाबाद : वृत्तसंस्था
भारतातील बिहारमधील काही मुस्लिम १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेले. ही मंडळी पाकिस्तानमध्ये बिहारी म्हणून ओळखली जातात. पण सध्या बिहारी या शब्दावरून तिथे गदारोळ माजला आहे. पाकिस्तानमधील सिंध राज्याच्या विधानसभेत त्यावरून राडा पाहायला मिळाला. पाकिस्तानच्या काही नेत्यांनी आमदार सय्यद एजाज उल हक यांचा बिहारी म्हणून खिल्ली उडवली होती. त्यानंतर त्यांनी या मुद्यावरून तडाखेबंद भाषण ठोकले. त्यांच्या भाषणाने अनेकांचे चेहरे झर्रकन उतरले. त्यांचे भाषण तीन महिन्यापूर्वी गाजले. त्यांच्या मुद्देसुद आणि धारदार शब्दांनी त्यांची टिंगल करणा-यांना तोंड लपवायला सुद्धा जागा उरली नाही. त्यामुळे एक बिहारी, पाकिस्तानवर भारी पडल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात रंगली आहे.
पाकिस्तानमध्ये जे बिहारमधील मुस्लिम गेले. त्यांची तिथे बिहारी म्हणून टिंगल टवाळी करण्यात येत असल्याचे दु:ख या नेत्याने त्याच्या भाषणातून व्यक्त केले. आपले पूर्वज पाकिस्तानच्या भविष्यासाठी, पाकिस्तानसाठी भारतातील सुवर्णकाळ मागे सारून आल्याचा दावा या नेत्याने विधानसभेत केला आहे.
बिहारींमुळे पाकिस्ताची ओळख : बिहारी ही काही शिवी नाही. बिहारी ते आहेत, ज्यांच्यामुळे पाकिस्तानची ओळख निर्माण झाली. पाकिस्तान अस्तित्वात आला असे आमदार सय्यद एजाज उल हक यांनी आपल्या तडाखेबंद भाषणात दावा केला. आता तुमच्याकडे जितकी संपत्ती आहे ना, तितकी तर आम्ही सोडून आलो आहोत, असा जाळ त्यांनी स्थानिक नेत्यांच्या कानाखाली काढला. त्यांच्या भाषणावर समर्थक बाके वाजवताना तर टीका करणारे मान खाली घालून ऐकताना दिसत आहेत.
फाळणीचे श्रेय बिहारी मुस्लिमांना
यावेळी सय्यद यांनी हिंदुस्थानच्या फाळणीचे श्रेय बिहारी मुसलमानांना दिले. बिहारी ही काही शिवी नाही, ज्यांना असे वाटत असेल त्यांनी पाकिस्तान कुणामुळे अस्तित्वात आला, हे लक्षात ठेवावे असे तडाखेबंद उत्तर त्यांनी दिले. हिंदुस्थानची फाळणी होणार, पाकिस्तान तयार होणार, हा नारा बिहारी मुस्लिमांनी पहिल्यांदा दिल्याची आठवण त्यांनी करून दिली.