20.4 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्रबीडमधील गुन्ह्यांचा आलेख वाढला

बीडमधील गुन्ह्यांचा आलेख वाढला

१० महिन्यांत ३६ खून अन् १५६ अत्याचार

मुंबई : प्रतिनिधी
सध्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून वातावरण तापले आहे. बीड जिल्ह्याचा बिहार झाला आहे का? असा प्रश्न विरोधकांनी केला आहे. तर, बीड जिल्ह्याला इतकेही बदनाम करू नये, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. असे असले तरी, बीडमधील गुन्ह्यांचा आलेख चढताच असल्याचे समोर आले आहे. अवघ्या १० महिन्यांत ३६ खून आणि १५६ अत्याचारांची नोंद येथे झाली आहे.

केज तालुक्यातील अवादा एनर्जी कंपनीचे काम सुरू ठेवण्यासाठी हात-पाय तोडण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मीक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे आरोपी आहेत.

याचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड असून तो मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. त्यामुळे यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनाही भाजपासह विरोधकांनी लक्ष्य केले आहे.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या काळात धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाच बीडमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढल्याची नोंद झाली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या दहा महिन्यांत बीड जिल्ह्यात ३६ खून नोंदवले गेले आहेत. यात परळीतील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या हत्येचाही समावेश आहे. तसेच खुनाचा प्रयत्न केल्याच्या १६८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

जमावाने मारामारी करणे, दंगल घडवणे यासारखे ४९८ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ७ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. या जिल्ह्यात महिला असुरक्षित असल्याचेही दिसत आहे. जिल्ह्यात अत्याचाराचे १५६ तर, विनयभंगांचे ३८६ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर, छेडछाडीच्या ३८६ घटनाही घडल्या आहेत.

फडणवीसांची कबुली
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना अतिशय गंभीर असल्याची कबुली देतानाच, तेथील गुन्हेगारांना आम्ही जरब बसवूच. तिथे कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे, या जिल्ह्याची तुलना बिहारमधील गुन्हेगारीशी केली जात आहे. हे योग्य नाही. या जिल्ह्याला एवढे बदनाम करू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR