बीड : प्रतिनिधी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. त्यानंतर सुरेश धसांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण केल्याचा व्हीडीओ समोर आला होता. त्याशिवाय संदीप क्षीरसागरचा कार्यकर्ता, प्रकाश सोळंकेंचा कार्यकर्ता यांच्याकडून मारहाण केली जात असल्याचे व्हीडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एक धक्कादायक बाब म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या सख्ख्या साडूकडून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हीडीओ समोर आला आहे.
दरम्यान, सध्या राज्याच्या राजकारणात बीड जिल्ह्याचे नाव चर्चेचा विषय ठरला आहे. बीड येथील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यानंतर आणखी एक संतापजनक व्हीडीओ समोर आला आहे. हा व्हीडीओ दोन वर्षे जुना असल्याचे सांगितले जात आहे. एका शेतामध्ये एका तरुणाला तिघांकडून काठी आणि पट्ट्याने मारहाण करीत असल्याचे व्हीडीओमध्ये दिसून येत आहे.
या मारहाणीत तरुण अक्षरश: रक्तबंबाळ झाला आहे. दादा खिंडकर हा संतोष देशमुख यांचा सख्खा साडू असून त्याने या तरुणाला बेदम मारहाण केली. कौटुंबिक कारणातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे. तर मारहाण होत असलेल्या तरुणाचे नाव ओंकार असल्याचे सांगितले जात आहे.