बीड : मध्ये खाद्यतेलाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील एफडीएच्च्या पथकाने बीड जिल्ह्यातील पाच तेल रिपॅकिंग उद्योगांवर अचानक धाडी टाकून मोठ्या प्रमाणात संशयित खाद्यतेल जप्त केले. या कारवाईमुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ६ आणि ७ ऑगस्ट रोजी टकऊउ बीड, माजलगाव आणि वडवणी परिसरात ही तपासणी करण्यात आली. पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल १ लाख १९ हजार १८७ किलो संशयित खाद्यतेल ताब्यात घेण्यात आले. या तेलाची अंदाजे किंमत १ कोटी ९४ लाख ५० हजार ९२२ रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
तपासणीदरम्यान तेलाच्या साठवणुकीपासून ते पॅकिंग आणि विक्रीपर्यंत अनेक त्रुटी आढळल्याचे समोर आले. काही ठिकाणी जुने आणि स्वच्छतेच्या निकषांवर प्रश्न निर्माण करणारे टिन पुन्हा वापरले जात असल्याचे आढळले. तसेच एकाच टाकीत साठवलेले तेल वेगवेगळ्या नावांनी बाजारात आणले जात असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले. याशिवाय तेल साठवण्याच्या टाक्यांची योग्य देखभाल नसणे, परिसरात स्वच्छतेचा अभाव, आवश्यक तांत्रिक कर्मचा-यांची कमतरता आणि नियमित प्रयोगशाळा तपासणी न करणे यांसारख्या बाबी आढळल्या. कर्मचा-यांकडे आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्रे नसल्याचेही तपासणीत समोर आले.
















