बीड : प्रतिनिधी
‘तुमची मुलगी मला द्या’ म्हणत बीडमध्ये एका शिक्षकाला गावगुंडाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंदुकीचा धाक दाखवत तरुणाने शिक्षकाला मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या कारवर ट्रॅक्टर घातले. जखमी शिक्षकावर बीडमधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. एकतर्फी प्रेमातून हा संपूर्ण प्रकार घडला असल्याचा आरोप शिक्षकाच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या केज तालुक्यातील वरपगाव येथील एका विद्यालयासमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘तुमची मुलगी मला द्या’ म्हणत शिक्षकाला शाळेबाहेर एका गावगुंडाने जबर मारहाण केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बंदुकीच्या धाकावर करण्यात आला, असा आरोप या शिक्षकाच्या नातेवाईकांनी केला आहे. या शिक्षकावर कु-हाड आणि कोयत्याने वार करण्यात आले. यानंतर आरोपीने या शिक्षकाच्या कारवर ट्रॅक्टर घालत मोठे नुकसान देखील केले.
बाजीराव डोईफोडे असे गावगुंडाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या शिक्षकावर सध्या बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही. या घटनेमुळे बीडमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण असून गावगुंडांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
आरोपी तरुण हा शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांना वारंवार त्रास देत होता. रस्ता अडवून धमक्या देखील देत होता. ‘तुमची मुलगी मला आवडते. ती मला द्या.’ असे तो वारंवार या शिक्षकाला म्हणत होता. आज त्याने शिक्षकाच्या कारला ट्रॅक्टरने धडक देत नंतर शिक्षकावर प्राणघातक हल्ला केला. एकतर्फी प्रेमातून आरोपीने हे सर्व कृत्य केले आहे. ‘आरोपीला एका तासाच्या आत पकडा नाही तर आम्ही पेट्रोल अंगावर टाकून जाळून घेऊ’, असा इशारा शिक्षकाच्या नातेवाईकांनी दिला आहे.