बीड : बीडमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे ही घटना घडली. विकास बनसोडे असे या हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. विकासला बेदम मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. विकासची हत्या झाल्यानंतर आरोपी भाऊसाहेब क्षीरसागरने त्याच्या कुटुंबीयांना फोन करून त्यांना ताबडतोब आमच्या घरी या असे सांगितले. त्यांच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
विकास बनसोडे हा २५ वर्षांचा तरुण भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता. भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे विकास ट्रकचालक म्हणून काम करत होता. विकासचे क्षीरसागरच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. याची माहिती क्षीरसागरला मिळताच त्याने विकासला दोन दिवस डांबून ठेवत बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
भाऊसाहेब क्षीरसागरने विकासच्या कुटुंबीयांना फोन करून ताबडतोब तुम्ही आमच्या घरी निघून या असे सांगितले. त्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये क्षीरसागर विकासच्या कुटुंबीयांना सांगतो की, तुम्ही नवरा-बायको लवकरात लवकर या. तुमचे जे कुणी असेल त्याला घेऊन या. इकडे आल्यावर तुम्हाला पराक्रम सांगतो. अर्जंटमध्ये या. जास्त टाईमपास करू नका. तुमचा लेक माझ्याकडे आहे. तुम्ही लवकर आमच्या घरी या.
क्षीरसागरच्या बोलण्यावर विकासची आई म्हणते की, आता आम्हाला एवढं अर्जंट वाहन कसं मिळेल आम्ही कसं येणार? त्यावर संध्याकाळपर्यंत तुम्ही कसंही या आमच्याकडे, असे क्षीरसागर त्यांना म्हणतो. ‘तुम्ही इथे या. आल्यानंतर तुम्हाला सर्व हिस्ट्री सांगतो. तुम्ही संध्याकाळपर्यंत इथे आले पाहिजे आणि येता येत नसेल तर तसं सांगा. तुम्ही आताच्या आता गाडीत बसले पाहिजे’ , अशी दमदाटी देखील तो विकासच्या कुटुंबीयांना करताना ऐकू येत आहे.
विकासची आई क्षीरसागरला विचारते ‘तो कुठे आहे?’ तर यावर तो आहे असं म्हणतो. यानंतर विकासची आई म्हणते की, ‘तुम्ही आता त्याला मारहाण केली असेल. पण आता त्याला मारू नका. आम्ही येईपर्यंत त्याला हात नका लावू. आम्ही येतो पण तुम्ही त्याला काही करू नका मामा’’, असे म्हणते. यावर क्षीरसागर त्यांना म्हणतो की, ‘मामा म्हणून माझीच वाट लावली.’