22 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeमहाराष्ट्रबीड-परभणीच्या घटनेचे दुस-या दिवशीही पडसाद

बीड-परभणीच्या घटनेचे दुस-या दिवशीही पडसाद

विरोधक आक्रमक, कामकाजावर बहिष्कार
-सत्ताधारी आमदाराचाही सरकारला घरचा आहेर

नागपूर : प्रतिनिधी
परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर या घटनेचा निषेध करणा-या आंबेडकरी अनुयायांवर पोलिसांकडून झालेला अमानुष लाठीहल्ला आणि बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या या मुद्यावर विरोधक आज विधानसभेत प्रचंड आक्रमक झाले. या विषयावर चर्चेला परवानगी न दिल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीने कामकाजावर बहिष्कार घातला तर शिवसेना सभात्याग केला. भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनीही या मुद्यावरून सरकारवर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारानी तर हिंमत असेल तर बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारा, असे आव्हान दिले.

विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या वतीने काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेद्वारे परभणीतील घटनेचा मुद्दा उपस्थित केला. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या घटनेवर राज्य सरकारला उत्तर द्यायचे आहे. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनाही चर्चेत सहभागी व्हायचे आहे. त्यामुळे उद्या या विषयावर चर्चा होईल, असे जाहीर केले. अध्यक्षांनी चर्चेची मागणी फेटाळली. पण आजच चर्चा घ्यावी, म्हणून आग्रही होता. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी परभणीत पोलिसांच्या लाठीहल्ल्यात सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आंबेडकरी चळवळीत उमटलेल्या प्रतिक्रियेची माहिती दिली. परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करायला उशीर केला. त्यामुळे प्रकरण पेटत राहिले. परभणीतील पोलिस कोंबिग ऑपरेशन हे शासन निर्मित होते काय? परभणीची घटना पेटवत का ठेवली? असे सवाल करत पटोले यांनी या संदर्भात नियम ५७ आणि नियम ९७ अन्वये नोटीस दिल्याचे अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतरही नितीन राऊत बोलायला उभे राहिले. त्यांनी अध्यक्षांकडे आज चर्चा का घेतली नाही, अशी विचारणा केली. परभणीच्या घटनेचा निषेध म्हणून नांदेड, पुणे, मुंबईत बंद पुकारण्यात आला होता. दलित चळवळीतील कार्यकर्ते विजय वाकोडे यांना परभणीच्या घटनेत आरोपी करण्यात आले होते. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती देत या मागे कोण आहे? असा सवाल त्यांनी केला. मात्र, त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी पुढील कामकाज पुकारल्याने विरोधी पक्षाने सरकारचा निषेध करत सभात्याग केला.

आरोपींना फाशीची शिक्षा द्या
भाजप आमदार नमिता मुंदडा यांनीही बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणात पोलिसांनी सातपैकी तीन आरोपींना अटक केल्याचे सांगत या गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती दिली.सरपंच हत्येच्या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील नागरिक भयभीत झाले असून यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे,अशी मागणी मुंदडा यांनी केली.

बीडमध्ये गुन्हेगारीचा वाढता पॅटर्न
त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे संदीप क्षीरसागर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आपण जसे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आव्हान म्हणून स्वीकारले तसे आव्हान बीडच्या पालकमंत्रिपदाचे स्वीकारा, असे क्षीरसागर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR