19.3 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रबीड, परभणी प्रकरण सरकार पुरस्कृत

बीड, परभणी प्रकरण सरकार पुरस्कृत

मुंबई : प्रतिनिधी
बीड-परभणीतील प्रकरण हे सरकार पुरस्कृत आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार सगळी माहिती घेऊन माध्यमांसमोर, विधानसभेत बोलत आहेत मग चौकशी, समिती ही नाटकं कशाला? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी तसेच गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. संजय राऊत हा आमचा विषय कधी राहिला नाही आणि राहणार देखील नाही, असेही पटोले म्हणाले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतल्यापासून राज्यातील महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या या घोषणेमुळे काँग्रेस आणि शिवसेनेमधील दरी वाढताना दिसत आहे. कोणाला मिरच्या लागण्याची गरज नाही, काँग्रेसच्या नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सुनावल्यानंतर आता काँग्रेसचे नेतेही आक्रमक झाले आहेत.

सरकारमधील आमदारच माहिती घेऊन मीडियासमोर आणि विधानसभेत बोलत आहेत. सरकारकडे सगळी माहिती असतानाही एसआयटी, सीआयडी नेमण्याचा जो खेळ सरकार करत आहे, तो केवळ जनतेच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी सुरू आहे, याचा पुनरुच्चार नाना पटोले यांनी केला. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो प्रयत्न या सरकारने चालवला आहे, तो थांबला पाहिजे. आरोपींवर तातडीने कारवाई आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

यापुढे महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी माणसं निर्माण होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. पण, सरकारने सगळा तमाशा करून ठेवलाय, असा संताप पटोले यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहि­णींना पैसे देऊन मते घेण्याचे पाप महायुतीच्या सरकारने केले. आता त्याच बहिणींना लुटायचा प्रकार सरकार करते आहे. सत्ता आल्यावर २१०० रुपये देऊ, असे तुम्ही सांगितले होते, त्याप्रमाणे पैसे द्या, असे आवाहन देखील पटोले यांनी महायुती सरकारला केले.

राऊत आमचा विषय नाहीच..
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी संजय राऊत हा आमचा विषय कधीच नव्हता, असे म्हणत आपण त्यांना महत्त्व देत नसल्याचे म्हटले आहे. आपल्यासमोर देशाची सुरक्षा, शेतक-यांचे प्रश्न आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसारखे प्रश्न आहेत. बीड-परभणीचे प्रकरण हे सरकार पुरस्कृत आहे. सरकारजवळ सगळी माहिती असताना जनतेचे लक्ष मूळ प्रश्नांवरून भरकटवण्यासाठी आणि गुन्हेगारांना वाचविण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR