बीड : प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी बीडमधील राजकीय आणि पोलीस अधिका-यांवर गंभीर आरोप केले आहेत. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग उघड झाल्यानंतर, या प्रकरणात अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांचे नाव समोर आले आहे.
तृप्ती देसाई यांनी २६ अधिका-यांची यादी पोलिसांना सादर केली असून, आज त्या पुराव्यानिशी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहणार आहेत.
तृप्ती देसाई यांनी यापूर्वी २७ जानेवारीला बीडमधील ६ अधिकारी आणि २० कर्मचा-यांवर भ्रष्टाचार आणि वाल्मिक कराडशी जवळीक ठेवण्याचा आरोप केला होता. त्यानंतर बीड पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी तपासासाठी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची नियुक्ती केली. पोलिसांनी आधीच संबंधित २६ जणांचे जबाब घेतले असून, आज तृप्ती देसाईंकडूनही अधिकृत पुरावे घेतले जाणार आहेत.
बीडमध्ये राजकारणीच गुंड
तृप्ती देसाई यांनी बीडमधील राजकारण्यांवरही थेट आरोप करत म्हटले की, बीडमध्ये गुंडाराज आहे, असे म्हणण्यापेक्षा इथले राजकारणीच गुंड आहेत. त्यांनी धनंजय मुंडे , सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्या टोळ्यांचा उल्लेख करत बीडमधील गुन्हेगारी वाढण्याला हेच लोक जबाबदार आहेत असा गंभीर आरोप केला. तृप्ती देसाई यांनी सांगितले की, मी पोलिस अधीक्षक कार्यालयात भेट देऊन सर्व पुरावे सादर करणार आहे. त्यानंतर मी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेणार आहे.