बीड : प्रतिनिधी
बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीदरम्यान छाया पांचाळ यांचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. व्यवस्थित प्रसूतीसाठी पैशाची मागणी पूर्ण करूनही उपचार न केल्याने महिलेचा बळी गेल्याचा आरोप पतीने केला. आठवड्यातील ही दुसरी घटना असून, दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये भाजप आमदारांच्या स्वीय सहाय्यकांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. हे प्रकरण चर्चेत असताना बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीदरम्यान मातेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छाया गणेश पांचाळ असे मयत मातेचे नाव आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर प्रसूती व्यवस्थित करण्यासाठी पैशाची मागणी केली. ती पूर्ण करूनही आमच्या पेशंटवर व्यवस्थित उपचार केले नाहीत, असा गंभीर आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.
रक्तस्त्राव होत असताना तिथल्या महिला कर्मचा-याला उपचार करा असे सांगितले असता आम्ही सर्वजण निघून जातो तुम्हीच तुमच्या पेशंटवर उपचार करा असे उद्धट उत्तरही दिल्याचे मयताच्या आईने सांगितले. अतिरक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनी रक्त तपासणीसाठी पाठवले व त्यानंतर रक्ताची पिशवी मागवली. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दिरंगाई झाली आणि त्याच कालावधीत मृत्यू झाला. तरी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी देखील नातेवाईकांनी केली आहे.
नॉर्मल प्रसूती झाली, त्यानंतर रक्तस्त्राव सुरू झाला. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांनी वेळेवर उपचार केले नाहीत तसेच रक्त पिशवी आणायला उशिरा सांगितली असा आरोप केला आहे. तसेच एवढा सिरीयस पेशंट असताना वैद्यकीय अधिका-यांनी नातेवाईकांना बाहेरून रक्त आणायला का सांगितले. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये रक्तस्त्राव झाला कसा यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रसूती व्यवस्थित करण्यासाठी पैशाची मागणी केली. २००० रु. देऊनही व्यवस्थित प्रसूती केली नाही म्हणून माझ्या पत्नीचा बळी गेल्याचा आरोप मयत महिलेच्या पतीने केला आहे.