देशभरातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये भक्तांच्या लाडक्या बाप्पांचे धुमधडाक्यात आगमन झाले आहे व सगळे गणेशोत्सवाच्या जल्लोषात दंग झाले आहेत. घरोघरी झालेल्या बाप्पांच्या आगमनाबरोबरच महानगरापासून गावखेड्यापर्यंतच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेश मूर्तींचीही उत्साहात स्थापना झाली आहे. लाडक्या बाप्पांचे आगमन सर्वांमधले सगळे भेदाभेद दूर करून चैतन्य, उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण करणारे असते. जसा गरीब बाप्पांच्या आगमनाने आनंदतो तसाच श्रीमंतही बाप्पांच्या चरणी भक्तिभावाने लीन होतो.
बाप्पा जसा सुखकर्ता आहे तसाच तो विघ्नहर्ता व दु:खहर्ताही आहे. त्यामुळे बाप्पांचे आगमन म्हणजे उत्सवाची नांदीच! आपल्या देशात तर उत्सवप्रियता ओथंबून वाहते त्यामुळे बाप्पांच्या आगमनाचा उत्सव तर दणक्यात साजरा होणे साहजिकच! त्यात वावगे काही नाहीच. उत्सव माणसाच्या जगण्याला प्रेरणा देतात, त्याला आशावादी व सकारात्मक बनवतात! ही सकारात्मक ऊर्जा प्रत्येकाला हवी असते व ती गणेशोत्सवातून मिळते. त्यामुळेच बाप्पांच्या आगमनाचा उत्सव सालोसाल वाढत जाणारा आहे. देशभर विशेषत: महाराष्ट्रात गणेशोत्सवापासून बाजारपेठेत उलाढाल प्रचंड वाढते व बाजारपेठेत एक अर्थचैतन्य निर्माण होते.
गणेशोत्सवापासून बाजारपेठेत निर्माण होणारे हे चैतन्य वर्ष संपेपर्यंत विविध निमित्ताने कायम राहते. त्यातून अर्थकारणाला जी गती मिळते ती कोट्यवधी हातांना तात्पुरता का असेना पण रोजगार उपलब्ध करून देते. एका अंदाजानुसार गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत होणारी आर्थिक उलाढाल ८० हजार कोटी रुपयांच्या जवळपास होऊ शकते. एकीकडे हे अर्थचक्रासाठीचे अत्यंत आश्वासक चित्र असले तरी दुसरीकडे सार्वजनिक गणेशोत्सवात जे धांगडधिंगा घालण्याचे, ध्वनी, प्रकाश, हवा अशा पर्यावरणाच्या प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस एवढे वाढत चालले आहे की, दरवर्षी ‘मागच्या वर्षीचा गोंधळ बरा होता,’ असे स्वत:चे समाधान करून घेण्याची वेळ येते. एकूणच बुद्धिदात्याच्या उत्सवात बुद्धी गहाण ठेवून सार्वजनिक गणेशोत्सवाने सांस्कृतिक प्रदूषणाचीही हद्द पार केल्याचे चित्र राज्यात गल्लोगल्ली पहायला मिळते आहे. त्यामुळे उत्सवाच्या नावावर होणा-या या सांस्कृतिक व सामाजिक अध:पतनाची खरोखरच गरज आहे का? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहात नाही.
विशेष म्हणजे ज्यांनी या सगळ्या अपप्रवृत्तींवर अंकुश ठेवला पाहिजे ते राज्यकर्ते व त्यांच्या हुकूमावर नाचणारे प्रशासन या धांगडधिंग्यात उत्साहाने सहभागी होताना दिसतात. राजकीय नेत्यांना उत्सवात मिळणारी आयती गर्दी आपले राजकीय व निवडणुकीचे गणित बसवणारी वाटत असल्याने खुणावते आणि मग जास्तीत जास्त गणेश मंडळांना, त्यांच्या पदाधिका-यांना ‘आपलेसे’ करण्यासाठीची स्पर्धा राजकीय नेत्यांमध्ये रंगते. जे सत्तेवर आहेत ते अर्थातच या स्पर्धेत आघाडीवर असतात. गणेश मंडळांना फुकट वीज देण्यापासून भर रस्त्यात मंडप घालून रस्ताच बंद करण्यापर्यंतच्या सगळ्या कामात सत्ताधारी मंडळी तात्पुरते मदतकार्य करत असते व त्यांच्या इशा-यावर प्रशासन कार्यरत असते. त्यामुळे हल्ली राज्यात गणेशोत्सवच नव्हे तर सर्वच उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम वगैरेमध्ये ‘नियम पाळा’च्या ऐवजी ‘बिनधास्त नियम पायदळी तुडवा’ हाच ट्रेंड रूढ झाला आहे. राज्यकर्त्यांना, राजकीय नेत्यांना आपल्या मतदारांना नाराज करायचे नाही कारण राजकीयदृष्ट्या ते त्यांना परवडणारे नाही.
त्यामुळे सामाजिकदृष्ट्या होणा-या नुकसानीकडे पाहण्याचीच त्यांची इच्छाशक्ती नाही मग ते हे नुकसान रोखणार कसे? हा प्रश्नच! त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी प्रशासन व मंडळांच्या पदाधिका-यांच्या बैठका होतात व सर्व प्रकारच्या प्रदूूषणास टाळण्यापासून मूर्तींच्या उंचीचे नियम पाळण्यापर्यंतची आवाहने होतात. माध्यमांमध्ये त्याच्या बातम्याही येतात. मात्र, प्रत्यक्षात कुठेच नियम पाळले जात असल्याचे पहायला मिळत नाही. सगळीकडे संवेदना हरपून बसलेल्या आणि एका वेगळ्याच नशेत हरपून सगळे नियम पायदळी तुडवणा-या समूहांचे व त्यांच्या लांगुलचालनातच आपली इतिकर्तव्यता मानणा-या स्वयंघोषित लोकनेत्यांचे दर्शनच सामान्यांना पावलोपावली होते. वाट्टेल तितका वेळ नाचा, वाट्टेल तेवढे मोठे मंडप घाला, वाट्टेल तेवढे कर्णकर्कश्श ध्वनिक्षेपक लावा, कितीही अपायकारक असल्या तरी लेझर शोच्या प्रकाशयोजना बिनधास्त करा,
मूर्तींचे जलस्रोतांमध्ये हवे तसे विसर्जन करा, असे सांगणारे व त्यासाठी प्रसंगी भांडून प्रशासनावर दबाव आणणारे लोकनेते कसे काय असू शकतात? हा प्रश्नच! मात्र, हल्ली गणेशोत्सवासह सर्व उत्सवांमध्ये, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वाहवत चाललेले समूह आणि त्यांचे लांगुलचालन करण्यात मग्न स्वयंघोषित लोकनेत्यांच्या मांदियाळीचेच चित्र सर्रास पाहायला मिळते. हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहणारी विवेकी माणसेही सध्या मौनच योग्य मानतात! जे लोक बोलू पाहतात त्यांचा आवाज क्षीण करण्याचाच प्रयत्न सर्वत-हेने होतो. अशा स्थितीत ‘तुमचे चुकते आहे’ असे खडसावून या सगळ्यांना कोण सांगणार? असाच प्रश्न आज आहे. श्री गणराय बुद्धीचे देवता आहेत. त्यांचा उत्सव साजरा करताना ही बुद्धी, संवेदना, प्रज्ञा भक्तांमध्ये उतरावी याचसाठी आराधना होते.
सध्याचे सार्वजनिक गणेशोत्सव खरेच ही आराधना करण्यासाठी आहेत का? असा प्रश्न खुद्द त्या बुद्धिदात्यालाही पडत असेल. बाप्पांना तरी हा सगळा प्रकार आवडत असेल का? हा प्रश्नही आपल्या मनात निर्माण होत नाही, हे समाजाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती सार्वजनिक रूपात आणताना जो उद्देश बाळगला होता त्या उद्देशाला तर आपण केव्हाच तिलांजली दिली आहे. मात्र बाप्पांच्या आगमनाचा उत्सव साजरा करताना त्यामागे जो भक्तिभाव आहे त्याचाही आपल्याला पुरता विसर पडलाय की काय? असाच प्रश्न हल्ली वारंवार निर्माण होतोय त्यामुळे आता बुद्धिदात्या श्री गणेशालाच ‘आम्हाला सद्बुद्धी द्या,’ असे साकडे घालण्याची व राज्यातील संस्कृतीवर, भक्तिभावावर, सामाजिक स्वास्थ्यावर निर्माण झालेले हे विकृतीचे विघ्न व संकट दूर करा, असे मागणे करण्याचीच वेळ आली आहे, हे मात्र निश्चित!