34.1 C
Latur
Saturday, March 29, 2025
Homeमहाराष्ट्रबुलडाण्यातील केसगळतीप्रकरणी आरोग्य राज्यमंत्र्यांवर हक्कभंग

बुलडाण्यातील केसगळतीप्रकरणी आरोग्य राज्यमंत्र्यांवर हक्कभंग

मुंबई : प्रतिनिधी
जानेवारी महिन्यात बुलडाण्याच्या शेगाव तालुक्यातील लोकांना अचानक पडू लागलेले टक्कल चर्चेचा विषय बनला होता. टक्कल पडत असल्याच्या समस्येमुळे गावांमधील वातावरण संपूर्णपणे बदलून गेले होते. पाण्याचे नमुने तपासून किंवा आरोग्य अधिका-यांनी भेटी देऊनही येथील समस्येत अद्यापही फार काही फरक पडलेला दिसून आला नाही. यासंदर्भात विधान परिषदेच्या सभागृहात आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी २० मार्च रोजी माहिती दिली होती की, केसगळतीचा प्रकार रेशनच्या गव्हामुळे किंवा पाण्यामुळे झाल्याचे दिसून येत नाही. मेघना बोर्डीकर यांच्या या माहितीवर काँग्रेस आमदाराने हक्कभंग आणला आहे.

दरम्यान, आमदार सत्यजित तांबे यांनी बुलडाण्यातील टक्कल पडण्याचा मुद्दा २० मार्च रोजी विधान परिषदेत उपस्थित केला होता. यावेळी किशोर दराडे, विक्रम काळे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला होता. मेघना बोर्डीकर यांनी उत्तर देताना म्हटले होते की, बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील केसगळतीचा प्रकार गंभीर असल्याचे सांगून राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, या केसगळतीचा प्रकार समोर आलेल्या प्रत्येक गावामध्ये घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले आहे. या ठिकाणचे पाणी, माती, रक्ताचे नमुने तसेच गहू यांचे नमुने गोळा करण्यात आले.

त्याच्या तपासणीसाठी आयसीएमआरकडे पाठवण्यात आले आहेत. आयसीएमआरचा अहवाल आल्यानंतर केसगळतीचा प्रकार कशामुळे घडत आहे हे स्पष्ट होईल आणि त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल. परंतु केसगळतीचा प्रकार रेशनच्या गव्हामुळे किंवा पाण्यामुळे झाल्याचे दिसून येत नसल्याची माहिती त्यांनी दिली होती. मात्र त्यांच्या या माहितीवर आक्षेप घेण्यात आला आहे.

बुलडाण्यातील केसगळतीप्रकरणी पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनानुसार, बुलडाण्यातील गावातील लोकांनी खाल्लेल्या रेशनच्या गहूमुळे हे झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या गव्हामध्ये सेलेनियमसारखा घटक मोठ्या प्रमाणात आढळला आहे आणि हा घटक शरीरात गेल्याने ही केसगळती झाल्याचा आरोप डॉ. बावस्कर यांनी केला होता. गहू पंजाब आणि हरियाणाच्या शिवालिक टेकड्यांमधून आला आहे.

या गव्हाच्या पिकाने दगडातील सेलेनियम हा घटक शोषून घेतला. हाच गहू रेशनच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यात वाटप झाल्याचा दावा हिम्मतराव बावस्कर यांनी केला होता. त्यामुळे मेघना बोर्डीकर यांनी सभागृहात दिलेली माहिती चुकीची आहे. त्यांनी टक्कल पडण्याच्या घटनेविषयी खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केली आहे, असे म्हणत काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी मेघना बोर्डीकर यांच्याविरोधात हक्कभंग आणला आहे. सभापती राम शिंदे यांनी मेघना बोर्डीकर यांच्यविरोधात हक्कभंग दाखल केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR