36.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमुख्य बातम्या‘बॅक्टिरियोफेज’मुळे दुषित होत नाही गंगेचे पाणी!

‘बॅक्टिरियोफेज’मुळे दुषित होत नाही गंगेचे पाणी!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हिमालयातून उगम पावणारी गंगा नदी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. गंगेचे पाणी अनेक महिने साठवता येते. ते खराब होत नाही. यातून साथीचा रोग किंवा इतर रोग पसरत नाहीत. विशेष म्हणजे, गंगा तिच्यात असलेल्या तीन घटकांमुळे स्वच्छ राहते. हे पाणी इतके स्वच्छ कसे राहते, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. एका अभ्यासातून महत्वाची माहिती समोर आली आहे.

स्वच्छ ठेवण्याची गुणवत्ता : ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग अँड रिसर्च’च्या शास्त्रज्ञांनी गंगा नदीवर संशोधन केले. यातून गंगेच्या पाण्यात स्वत:ला स्वच्छ ठेवण्याची गुणवत्ता असल्याचे समोर आले. गंगेच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात ‘बॅक्टेरियोफेज’ असते, जे गंगेचे पाणी प्रदूषित होण्यापासून रोखते. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ गंगा मिशन’ अंतर्गत निरीचे संशोधक डॉ. कृष्णा खैरनार यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनासाठी गंगा तीन टप्प्यात विभागली गेली. पहिला गोमुख ते हरिद्वार, दुसरा हरिद्वार ते पाटणा आणि तिसरा पाटणा ते गंगासागर.

वेगवेगळ्या ५० ठिकाणचे नमुने : डॉ. खैरनार यांनी सांगितल्यानुसार, संशोधकांनी ५० वेगवेगळ्या ठिकाणांहून गंगाजल आणि नदीच्या पात्रातील वाळू आणि मातीचे नमुने घेतले. संशोधकांना आढळले की, गंगा नदीमध्ये स्वत:ला शुद्ध करण्याचे गुणधर्म आहेत. संशोधकाने गेल्या कुंभमेळ्यातही नमुने गोळा केले होते. संशोधकांना गंगेच्या पाण्यात बॅक्टेरियोफेजेस आढळले, जे पाण्यातील जंतू नष्ट करतात. यामुळे गंगा कधी दूषित होत नाही.

ऑक्सिजनचे भरपूर प्रमाण : गंगेच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण खूप जास्त असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. गंगेच्या पाण्यात ऑक्सिजनची पातळी २० मिलीग्राम प्रति लिटरपर्यंत आहे. यासोबतच ‘टेरपीन’ नावाचे फायटोकेमिकल सापडले. ही तीन तत्त्वे गंगेचे पाणी शुद्ध ठेवतात. यामुळे गंगेचे पाणी कधीच खराब होत नाही. विशेष म्हणजे, संशोधकांनी यमुना आणि नर्मदा नद्यांच्या पाण्यावरही संशोधन केले. मात्र, या नद्यांच्या पाण्यात गंगेच्या पाण्यात असलेले घटक अत्यंत कमी प्रमाणात असल्याचे समोर आले आहे.

१२ वर्षे गंगेवरील संशोधन : सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ २०२५ चे आयोजन केले जात आहे. महाकुंभात दररोज लाखो भाविक गंगेत स्रान करतात. मात्र गंगेचे पाणी पाच किलोमीटर अंतरापर्यंत गेल्यावर आपोआप शुद्ध होते. गंगेतील तीन घटक नदीला लगेच शुद्ध करतात. संशोधकांनी १२ वर्षांच्या संशोधनातून ही महत्वाची बाब शोधून काढली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR